Coronavirus : जगानं वाभाडे काढले; कोकणातले, विदर्भातील पोपट आता शांत का?; अरविंद सावंत यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 04:31 PM2021-05-02T16:31:40+5:302021-05-02T16:33:56+5:30
कोरोनावर मात करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. राजकीय आखाडे नंतर भरवू, सावंत यांचं वक्तव्य
सध्या देशात कोरोनाच प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य सेवांवर मोठा ताण पडत आहे. अनेक देशांनी भारताकडे आता मदतीचा हात पुढे केला आहे. परंतु काही परदेशातील माध्यमांनी देशातील कोरोनाच्या परिस्थितीवरून टीकाही केली होती. यावर तसंच निवडणुकीच्या निकालावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाष्य केलं. "देशाची मलीन झालेली प्रतीमा पुन्हा चांगली करणं कठिण होईल. जगानं वाभाडे काढले. म्हणूनच सर्व शांत आहे. कोकणातले पोपट, विदर्भातले पोपट सगळे शांत आहेत, असं म्हणत त्यांनी जोरदार निशाणा साधला.
"काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितलं मी एकरकमी पैसे द्यायला तयार आहे मला १२ कोटी लसी द्या. आम्ही बाजारातून खरेदी करतो त्याला परवानगी द्या असंही ते म्हणाले. आता तुम्ही करताय पण सर्वात पहिल्यांदा लष्कराची मदत घेऊन ऑक्सिजनची वाहतूक करा असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. तेदेखील ऐकलं नाही. प्रत्येक गोष्टीत राजकारण केलं. चांगल्या सूचना आल्या की त्या स्वीकारून पुढे जावं. त्यांचे इथले पोपट राज्यावर तुटून पडत होते त्यांना आता केंद्राकडे जाऊन या तुमच्या त्रुटी आहेत असं सांगण्याची हिंमत आहे का? आता बिळात लपून बसलेत सगळे," असं म्हणत सावंत यांनी केंद्रावर निशाणा साधला. एका मराठी वृत्तवाहिनीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.
"लसीकरणातही महाराष्ट्र आघाडीवर आहे. परंतु दुर्देवानं कोरोनाबाधितांच्या संख्येतही महाराष्ट्र आघाडीवर आहे. मुंबईतील संख्या आता कमी होतेय आणि ती अजून कमी व्हायला हवी. लॉकडाऊन लावताना जे सर्व पोपट काही गोष्टी सुरू करण्याची भाषा करत होते त्यांना आता पुढे भारतात फिरणंही मुश्किल होईल. किती गोष्टी लपवणार?" असा सवालही त्यांनी केला. जिंकणं आणि हरणं हा शेवटचा प्रश्न आहे. जगणं हा महत्त्वाचं आहे. यावेळी त्यांनी पंढरपूर पोटनिवडणुकीवरही भाष्य केलं. पंढरपुरात काहींना वाटतंय की देवळात जाऊ दिलं नाही. भाजपनं याठिकाणी लोकांची माथी भडकवण्याचं काम केलं. त्याचा हा परिणाम दिसत असल्याचे अरविंद सावंत यांनी सांगितलं.
... म्हणूनच सर्व शांत
"देशाची मलीन झालेली प्रतीमा पुन्हा चांगली करणं कठिण होईल. जगानं वाभाडे काढले. म्हणूनच सर्व शांत आहे. कोकणातले पोपट, विदर्भातले पोपट सगळे शांत आहेत. असं काही झालं तरी आम्हाला आनंद नाही होत. आमच्या देशाचे पंतप्रधान आहे. कोरोनावर मात करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. राजकीय आखाडे नंतर भरवू,"असंही त्यांनी स्पष्ट केलं.