Coronavirus: भाजपा नेत्यांकडून पीएम फंडासाठी फ्रॉड वेबसाईट्सची लिंक; गृह राज्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 10:49 AM2020-04-20T10:49:29+5:302020-04-20T10:53:26+5:30
काही जणांनी पीएम फंडाचा गैरवापर करत बनावट वेबसाईट, यूपीआय आयडी बनवले होते
मुंबई – देशात आलेल्या कोरोना संकटावर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडून लोकांना मदतीचं आवाहन करण्यात येत आहे. यासाठी केंद्राने पीएम केअर फंड जमा करण्याची मोहीम सुरु केली आहे. यासाठी वारंवार प्रशासनाकडून लोकांना या फंडसाठी देणगी देण्याचं आवाहन करण्यात येत आहे. भाजपा नेतेही पीएम फंडासाठी निधी जमा करत आहेत.
मात्र काही जणांनी पीएम फंडाचा गैरवापर करत बनावट वेबसाईट, यूपीआय आयडी बनवले होते. याबाबत सायबर पोलिसांकडून लोकांना सतर्कही करण्यात येत होतं. तरीही महाराष्ट्रातील भाजपाच्या दिग्गज नेत्यांकडून लोकांना आवाहन करताना मोठी चूक केल्याचं दिसून आलं. भाजपा नेत्यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान केअर फंडासाठी निधी जमा करण्यासाठी माझा देश हीच माझी ओळख आहे आणि आज माझ्या देशाला माझी गरज आहे अशाप्रकारे लोकांना आवाहन केले. इतकचं नाही तर यामध्ये एकमेकांना चॅलेंज देऊन नॉमिनेट करावे असंही सांगण्यात आलं.
मदतीत पण फ्रॉड? का पक्षाच्या नेत्यानांच/ माजी मंत्र्यांनाच माहीत नाही पीएम केअर्स फंड कोणता आहे? ह्या फ्रॉड लिंकची तपासणी आम्ही करूच...पण,भाजप नेत्यांनी आपण काय करत आहोत याचे भान सोडू नये. https://t.co/EWQUHUJHGd ही लिंक fake आहे. https://t.co/74qbysYEcR
— Satej (Bunty) D.Patil (@satejp) April 19, 2020
पण हे आवाहन करताना भाजपाच्या दिग्गज नेते चंद्रकांत बावनकुळे, गिरीश महाजन, खासदार हिना गावित अशा नेत्यांनी ट्विटरवरुन बनावट वेबसाईट मेन्शन केल्याने सत्ताधाऱ्यांनी त्यांना लक्ष केलं. याबाबत राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी मदतीत पण फ्रॉड? असा सवाल उपस्थित करत पक्षाच्या नेत्यांनाचा आणि माजी मंत्र्यांना पीएम केअर्स फंड कोणता आहे? याची माहिती नाही. या फ्रॉड लिंकची तपासणी आम्ही करु पण भाजपा नेत्यांनी आपण काय करत आहोत याचे भान सोडू नये असं सांगत pmcaresfund.online ही लिंक फेक आहे असं सांगितले आहे.
तत्पूर्वी काही दिवसांपूर्वी याबाबत दिल्ली पोलिसांनीही सांगितले होते की, पंतप्रधान मदत निधीसाठी यूपीआयआयडी PMCARES@SBI म्हणजे पीएमकेअर्स @एसबीआय आहे, बनावट खाते PMCARE@SBI अर्थात पीएमकेअर@एसबीआय. दोन्ही आयडीमध्ये (S) एसचा फरक आहे. खरा यूपीआय आयडी पीएमकेअर्स आहे तर बनावट पीएमकेअर., हे बनावट खाते सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहे, त्यानंतर सायबर सेलने फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता. सध्या हे बनावट खाते बंद केले गेले आहे. एका S या अक्षरामुळे तुमची फसवणूक होऊ शकते