CoronaVirus: जीवनावश्यक वस्तूंची दुकानं २४ तास सुरू ठेवा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 06:41 PM2020-03-26T18:41:21+5:302020-03-26T19:01:01+5:30
CoronaVirus: दुकानातील गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
मुंबई: कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सरकारकडून विविध पावलं उचलली जात आहेत. दुकानांमध्ये होणाऱ्या गर्दीला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकानं २४ तास सुरू ठेवण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली आहे. दुकानांमध्ये खरेदीसाठी होणारी गर्दी आणि त्यामुळे असलेला संसर्गाचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेत असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
"सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना २४ तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे."
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 26, 2020
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकानं, किराणा दुकानं, औषधांची दुकानं २४ तास सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी कोरोना उपयाययोजनांच्या संदर्भात मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आज बैठक झाली. त्यात यावर चर्चा झाली.
मात्र संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता या बाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शन सूचना पाळाव्या लागतील.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 26, 2020
लॉकडाऊनमुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्न धान्य खरेदी करता यावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता याबाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शन सूचना पाळाव्यात असंही यासंदर्भात झालेल्या बैठकीत ठरलं.