CoronaVirus : ...म्हणून वास घेण्याची क्षमताही होते कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 02:49 AM2020-04-26T02:49:29+5:302020-04-26T06:34:17+5:30
कुठल्याही संसर्गामध्ये चव आणि वास घेण्याच्या क्षमतेवर (घ्राणशक्ती) थोडा परिणाम होत असतो; पण तो न जाणवण्याइतपत असतो. कोरोना विषाणूच्या संसर्गात मात्र तो प्रकर्षाने जाणवतोे.
- डॉ. अमोल अन्नदाते,
‘कोविड-१९’ संसर्गाच्या लक्षणांपैकी ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास, सर्दी ही लक्षणे सोडून अजून एक महत्त्वाचे लक्षण सगळ्यांनी समजून घेतले पाहिजे. ते म्हणजे अचानक वास घेण्याची क्षमता कमी होणे. कुठल्याही संसर्गामध्ये चव आणि वास घेण्याच्या क्षमतेवर (घ्राणशक्ती) थोडा परिणाम होत असतो; पण तो न जाणवण्याइतपत असतो. कोरोना विषाणूच्या संसर्गात मात्र तो प्रकर्षाने जाणवतोे. ही क्षमता चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही वासांसाठी कमी होते. यात सर्वप्रथम जेवण करताना त्याचा सुवास न जाणवणे, अंघोळ करताना साबणाचा किंवा टाल्कम पावडरचा वास न जाणवणे... अशी लक्षणे सहज लक्षात येणारी आहेत.
वास येणे पूर्णपणे बंद होणे किंवा वास येणे कमी होणे, अशा दोन्ही गोष्टी होऊ शकतात. काही रुग्णांमध्ये संसर्ग होण्याचे हे पहिले लक्षण असू शकते. पण यासोबत ताप, खोकला ही लक्षणे असतातच. परदेशात मात्र काही रुग्णांमध्ये इतर कुठलीही लक्षणे सोडून फक्त घ्राणशक्ती कमी होणे एवढे एकच लक्षण आढळले आहे. भारतात यावर अजून माहिती येण्यास वेळ लागेल.
कोरोना संसर्गातून रुग्ण बरा झाला की वास घेण्याची क्षमता पूर्ववत होते. हे लक्षण महत्त्वाचे यासाठी वाटते, की ‘कोविड-१९’ सोडून इतर व्हायरल आजार व फ्लूमध्ये हे जास्त प्रमाणात जाणवत नाहीत. म्हणून ताप, सर्दी, खोकला या लक्षणांसोबत वासाची क्षमता कमी झाली असल्यास डॉक्टरचा सल्ला घ्या.
नाकामध्ये पॉलीप म्हणजे लटकणारे गुच्छ असणे, अॅलर्जीमुळे असणारी दीर्घकालीन सर्दी, नाकातील हाड वाढलेले असणे, नाकाच्या मधला पट वाकडा असणे या आजारांमध्येही घ्राणशक्ती कमी होते; पण त्या कुठल्याही आजारामध्ये ताप नसतो.
(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)