coronavirus : दहावीचा भूगोलाचा पेपर अखेर रद्द; नववी,अकरावीच्या परीक्षेबाबतही झाला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 19:43 IST2020-04-12T18:33:10+5:302020-04-12T19:43:57+5:30
लॉकडाऊनमुळे दहावीचा भूगोलाचा पेपर लांबणीवर टाकण्यात आला होता.

coronavirus : दहावीचा भूगोलाचा पेपर अखेर रद्द; नववी,अकरावीच्या परीक्षेबाबतही झाला निर्णय
मुंबई - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दहावीचा भूगोलाचा पेपर लांबणीवर टाकण्यात आला होता. दरम्यान, या पेपरबाबत शिक्षण खात्याने अखेर मोठा निर्णय घेतला आहे. दहावीचा हा पेपर अखेर रद्द करण्यात आला आहे. तसेच नववी आणि अकरावीचा पेपर होणार नाही. याबाबतची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या आणि वाढवलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर पडलेल्या दहावीच्या भूगोलाच्या पेपरबाबत काय निर्णय होतो याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले होते. तसेच कोरोनामुळे उदभवलेल्या भयावह परिस्थितीमुळे मुलांना परिक्षेसाठी पाठवण्यास अनेक पालक इच्छुक नव्हते. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्रालयाने हा पेपर रद्द करून विद्यार्थ्यांना दिलासा दिला.
*दहावीचा पेपर रद्द*
*नववी आणि अकरावीची परीक्षा रद्द*
- *शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड*
मुंबई, दि. १२; इयत्ता दहावीचे भूगोल आणि कार्यशिक्षण हे दोन्ही पेपर रद्द करण्यात आले असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षा महामंडळाच्या प्रचलित व विहित कार्यपद्धतीनुसार विद्यार्थ्यांच्या गुणांबाबत कार्यवाही करण्यात येईल. त्याच प्रमाणे नववी आणि अकरावीची परीक्षा देखील रद्द करण्यात आली आहे. अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशात टाळेबंदी लागू केली होती. या पार्श्वभूमीवर इयत्ता नववी व अकरावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र राज्यातील परिस्थिती बघता ही टाळेबंदी ३० एप्रिल पर्यंत वाढविण्यात आली असल्याने नववी व अकरावीच्या दुस-या सत्रातील परीक्षा न घेता, पहिल्या सत्रामध्ये झालेल्या चाचण्या, प्रात्यक्षिके आणि अंतर्गत मुल्यमापण करून विद्यार्थ्यांची वर्गोन्नती करून त्यांना पुढच्या वर्गात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भातील प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने शासनास सादर केला होता. यावर निर्णय घेऊन त्यासाठी आवश्यक त्या सूचना संबधितांना देण्यात आल्या आहेत असेही प्रा. गायकवाड यांनी सांगितले आहे
दरम्यान, दहावीच्या भूगोलाच्या पेपरसोबतच नववी आणि अकरावीच्या परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या सर्व विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याचा निर्णय सुरू आहे.