CoronaVirus: एसटीची 'सुरक्षित अंतर ठेवा' योजना फसली; कर्मचाऱ्यांचं आरोग्य धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 06:23 PM2020-03-28T18:23:56+5:302020-03-28T18:26:04+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न
मुंबई : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, ‘सुरक्षित अंतर ठेवा’ योजनेअंतर्गत एसटी बसमधील बैठक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला. यानुसार दोन आसन क्षमतेच्या बैठक व्यवस्थेवर केवळ एकच प्रवासी बसवण्यात येईल. मात्र एसटी महामंडळाकडून पुरविल्या जाणाऱ्या अत्यावश्यक सेवेमध्ये ही योजना पूर्णतः फसल्याचे दिसून येत आहे.
प्रवाशांमधील संसर्ग टाळण्यासाठी, सुरक्षित अंतर ठेवून प्रवास करण्याच्या दृष्टीने काही आसने बैठक व्यवस्थेसाठी बंद ठेवली होती. त्यानुसार बसच्या प्रत्येक दोन आसन क्षमतेच्या बैठक व्यवस्थेवर केवळ एकच प्रवासी बसविण्याची योजना आखली. याप्रमाणे संपूर्ण बसमध्ये बस क्षमतेच्या केवळ 50 टक्केच प्रवासी बसवून, ती बस इच्छितस्थळी नेण्याच्या सुचना दिल्या होत्या. यासह कोणत्याही बसमध्ये गर्दी टाळण्यासाठी उभे राहून प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी नाही. आवश्यकतेनुसार जादा बस सोडण्याच्या सूचना परिपत्रकातून एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागामार्फत संबंधित प्रशासनाला पाठविण्यात आले होते. मात्र अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या प्रवाशांच्या आरोग्याची कोणतीही काळजी घेतली जात नाही, असे दिसून येत आहे. काही बसमध्ये प्रवासी उभ्याने प्रवास करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनासाठी लढणाऱ्या कर्मचाऱ्यांचेच आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती आहे.
एसटीच्या प्रवासामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बसस्थानके धुणे, एसटी कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरची बाटली देणे, अशा खबरदारीच्या सूचना परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिल्या होत्या. मात्र एसटी महामंडळाने या सूचनांचे पालन एक दिवसासाठी केले. आता बसही धुतली जात नाही आणि एसटी कर्मचाऱ्यांना मास्कही देत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी एसटी कर्मचाऱ्यांसह अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे.
प्रवाशांच्या संपर्कात येत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दररोज मास्क पुरविण्यात यावे, अशा सूचना परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिल्या होत्या. त्यानुसार चालक, वाहक, कंट्रोल कॅबिनमधील वाहतूक नियंत्रक व बसस्थानकातील वाहतूक पर्यवेक्षक यांना संसर्गापासून सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने एकच दिवस डिस्पोजल मास्क पुरविण्यात आले. त्यानंतर कर्मचाºयांना मास्क महामंडळाकडून देण्यात आले नाहीत, अशी माहिती एसटीतील सूत्रांनी दिली.
एसटी बसची, बसस्थानकांचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता करण्याबाबत परब यांनी निर्देश दिले होते. मात्र आगारात कर्मचाºयांची संख्या कमी असल्याने बसस्थानकांची स्वच्छता आणि एसटी बसची स्वच्छता होत नसल्याचे दिसून आले.