coronavirus: आंतरजिल्हा प्रवेश सुरू करण्याबाबत राज्य सरकारकडून विचार सुरू, लवकरच निर्णय होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 15:54 IST2020-06-23T15:48:49+5:302020-06-23T15:54:08+5:30
कामगार, मजूर पुन्हा आपल्या कामावर परतत आहेत. विविध साहित्य, वस्तू व्यापाऱ्यांना खरेदी करण्यासाठी बाहेर पडणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकार १ जुलैपासून काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये सूट देण्याच्या तयारीत आहे

coronavirus: आंतरजिल्हा प्रवेश सुरू करण्याबाबत राज्य सरकारकडून विचार सुरू, लवकरच निर्णय होण्याची शक्यता
गडचिरोली - राज्य सरकारचा १ जुलैपासून रेड झोन तसेच प्रतिबंधात्मक क्षेत्र सोडून इतर ठिकाणी आंतरजिल्हा प्रवास सुरू करण्यासाठी परवानगी देण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री लवकरच निर्णय जाहीर करतील. आता कामगार, मजूर पुन्हा आपल्या कामावर परतत आहेत. विविध साहित्य, वस्तू व्यापाऱ्यांना खरेदी करण्यासाठी बाहेर पडणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकार १ जुलैपासून काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये सूट देण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली येथे दिली.
पत्रकार परिषदेत माहिती देताना विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्यातील मंगल कार्यालयामध्ये वातानूकुलित यंत्र न लावता सर्व कार्यालये ५० व्यक्ती व ५ वाजंत्री यांच्या परवानगीत सुरू करण्याच्या लेखी सूचना काढत आहोत. पावसाळा सुरू झाला आहे. यावेळी त्यांना लग्न सोहळा सुरक्षित ठिकाणी पार पाडता यावा म्हणून शासनाकडून हा निर्णय घेतला जात असल्याचे ते म्हणाले. याव्यतिरीक्त राज्यातील नाभिक व्यवसायिकांच्या प्रश्नावरही लवकरच तोडगा काढत आहोत. नॉन एसी केशकर्तनालय सुरू करण्यासाठीची परवानगी येत्या आठ दिवसात देण्याबाबत चर्चा सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाचा सामाजिक प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर, शारीरिक अंतर राखून काम करण्याची सवय प्रत्येकाला लागणे अत्यावश्यक आहे. लोकांनी सार्वजनिक ठिकाणी काळजी घेणे आवश्यकच आहे, असे ते यावेळी म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या