CoronaVirus: वर्तमानपत्रांच्या घरोघरी वितरणावरील बंदी उठवली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 06:12 AM2020-04-22T06:12:54+5:302020-04-22T06:49:25+5:30
मुंबई, पुण्यासह कंटेनमेंट क्षेत्रामध्ये मात्र निर्बंध कायम राहणार
मुंबई : वर्तमानपत्रांच्या घरोघरी वितरणावर आणलेले निर्बंध राज्य सरकारने मंगळवारी मागे घेतले. वृत्तपत्रांचे वितरण करणारे विक्रेते हे मास्क लावून, जंतुनाशके हाताला लावून तसेच सामाजिक अंतर ठेवून वृत्तपत्रे घरोघरी देऊ शकतात, असा आदेश राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी काढला.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभर लागू असलेल्या लॉकडाउनमधून मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक्स प्रसारमाध्यमांना केंद्र सरकारने सूट दिलेली आहे. तसे परिपत्रही जारी केले आहे. मात्र, राज्य सरकारने २० एप्रिलपासून काही निर्बंध शिथिल करताना वृत्तपत्रांच्या छपाईला असलेली परवानगी कायम ठेवत घरोघरी (डोअर-टू-डोअर) वाटप करण्यास मात्र निर्बंध आणले होते. वृत्तपत्रांची विक्री स्टॉलवर करावी, असे सरकारने म्हटले होते. सरकारच्या या निर्णयास मुद्रित माध्यमातून तीव्र विरोध झाला. तसेच उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ‘स्यू मोटो’ याचिका दाखल करून घेत, यावर प्रधान सचिवांना २४ एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते. तर नागपूर खंडपीठात महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ व नागपूर श्रमिक पत्रकार संघ यांनी सरकारच्या निर्णयाविरुद्ध रिट याचिका दाखल केली होती. त्यावर नागपूर खंडपीठाने केंद्र, राज्य सरकार व नागपूर महापालिका आयुक्त यांना नोटीस बजावून २३ तारखेला उत्तर देण्यास सांगितले होते.
मास्क बंधनकारक
यासंदर्भात राज्य सरकारने सुधारित आदेश काढत वृत्तपत्रांच्या घरोघरी वितरणास सशर्त परवानगी दिली आहे. त्यानुसार वृत्तपत्रांची विक्री करणाऱ्यांनी मास्क घालणे बंधनकारक आहे. तसेच हॅन्ड सॅनिटायझर वापरणे व सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे.
या भागात निर्बंध कायम : मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्र (एमएमआर रिजन), पुणे महानगरपालिका क्षेत्र तसेच राज्यातील ज्या भागात संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले असेल, अशा भागात वृत्तपत्रांचे घरोघरी वाटप करता येणार नाही.
१७ एप्रिलच्या अधिसूचनेत बदल
मुंबई महानगर आणि पुणे महानगर क्षेत्रासाठी नवी अधिसूचना लागू असेल. म्हणजेच १७ एप्रिलला सुधारित अधिसूचनेपूर्वीची परिस्थिती मुंबई महानगर आणि पुणे महानगरसाठी लागू राहील. उर्वरित राज्यात १७ एप्रिलप्रमाणे शिथिलता राहील.
ई-कॉमर्स कंपन्यांना इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची वाहतूक करण्यास दिलेली मुभा रद्द करण्यात आली आहे. त्यांना केवळ अन्न, जीवनावश्यक वस्तू, औषधी आणि वैद्यकीय उपकरणांचीच वाहतूक करता येईल. फरसाण, मिठाईची दुकाने, कन्फेक्शनरी दुकाने मुंबई-पुण्यात बंदच राहतील.
मुंबई आणि पुण्यात बांधकामेदेखील बंदच राहतील, तसेच या भागांतील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनीदेखील त्यांच्या कर्मचाºयांकडून ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीनेच काम करून घ्यायचे आहे.