Coronavirus: राज्याकडे साथरोग नियंत्रणाची माहितीच नाही; एमएसआरडीसीवर सोपविली जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 02:21 AM2020-07-02T02:21:02+5:302020-07-02T02:21:18+5:30
कोरोनाचे करणार अभ्यासपूर्ण डॉक्युमेंटेशन
नारायण जाधव
ठाणे : देशात किंवा राज्यात कोरोनापूर्वी येऊन गेलेल्या इतर महामारींसह साथरोगांवर कशाप्रकारे नियंत्रण मिळविले, कोणकोणत्या उपाययोजना केल्या, याची कोणतीही माहिती महाराष्ट्राकडे नाही. यामुळे सध्या जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनावर नियंत्रण मिळवितांना सरकारच्या नाकीनऊ आले आहेत.
हा साथरोग राज्यासह संपूर्ण जगाला नवीन असून त्यावर औषधही नाही. यामुळे कोविडवर नियंत्रण मिळविण्यासाठी आतापर्यंत लॉकडाऊनसह जगातील इतर देशांनी किंवा भारतातील इतर राज्यांनी कोणत्या उपाययोजना राबविल्या याचा अभ्यास करून महाराष्ट्राचा आरोग्य विभाग मार्गक्रमण करीत आहे. मात्र, भविष्यात अशाप्रकारे एखादी महामारी उद्भवल्यास त्यावर सुयोग्य नियंत्रण मिळविता यावे यासाठी कोविडवर नियंत्रण मिळविण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचे डॉक्युमेंटेशन करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
राज्याच्या आरोग्य विभागासह शहरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस आणि जिल्हा यंत्रणा आणि राज्याच्या मंत्रीगटाने कोणकोणत्या उपाययोजना सुचविल्या, कोणत्या राबविल्या, कोणत्या योजना यशस्वी झाल्या, त्यासाठी कायकाय केले, याचा अभ्यास करून सुयोग्य असे डॉक्युमेंटेशन तयार करण्यास एमएसआरडीसी अर्थात रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना सांगितले आहे. यात विविध औषधी,थेरपींचा कोरोना नियंत्रणासाठी कसा उपयोग झाला, हे पुराव्यानिशी या डॉक्युमेंटेशनमध्ये असणार आहे.
होमिओपॅथिक अर्सेनिक अल्बमपासून आयुर्वेदीक काढे, औषधी ते रेमडेसिवीर, प्लाझ्मा थेरेपीपर्यंतची अभ्यासपूर्ण मांडणी करण्यास एमएसआरडीसीच्या व्यवस्थापकीय संचालकांना सांगितले आहे. यासाठी त्यांनी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा कृती गट स्थापून त्याने राज्य शासनाने आणि शहरी , ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसह पोलीस आणि जिल्हा यंत्रणा आणि राज्याच्या मंत्रीगटाशी संपर्क साधून त्यांनी केलेल्या, सुचविलेल्या बेस्ट प्रॅक्टिसेसचे डॉक्युमेंटेशन करावे. याचा सर्व खर्च एमएसआरडीसीनेच करायचा आहे.
मुंबईसह पुणे महानगर प्रदेशातील साथीचा अभ्यास
एमएसआरडीसीचे हे पथक प्रामख्याने पुणे आणि मुंबई महानगर प्रदेशातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीसह इतर औरंगाबाद, मालेगांवसारख्या शहरांत कोरोनाची साथ कशामुळे पसरली, त्याची प्रमुख कारणे, धारावी झोपडपट्टीत कोरोना पसरण्याचे आणि नियंत्रणात येण्याची कारणे काय, लॉकडॉऊनचा कितपत उपयोग झाला, प्रवासी मजुरांचे स्थलातंर, त्याचे चांगले-वाईट परिणाम याचा अभ्यास करून त्याचाही या डॉक्युमेंटेशनमध्ये समावेश करणार आहे.