Coronavirus : आरोग्यमंत्र्यांनी सांगितली दिलासादायक गोष्ट; कोरोनाला हरवण्याचा दिला 'मंत्र'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 04:42 PM2020-03-24T16:42:09+5:302020-03-24T16:44:53+5:30
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीसुद्धा फेसबुक लाइव्ह करत राज्यातील सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली आहे.
मुंबईः जगभरात वाऱ्यासारख्या पसरलेल्या कोरोनानं भारतातही धुमाकूळ घातला आहे. भारतातली अनेक राज्यं कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे. त्यानंतर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून, रेल्वे, बससेवा बंद केली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीसुद्धा फेसबुक लाइव्ह करत राज्यातील सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली आहे. मी घरी थांबणार, मी कोरोना हरवणार, असं आरोग्य मंत्र्यांनी आवाहनही केलं आहे.
औषध उपलब्धता, वैद्यकीय साठा, खाटांचा रिव्ह्यू घेण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाग्रस्तांना 1000 रुग्णालये सेवा देणार आहेत. जिल्हा पातळीवरची यंत्रणाही मोठ्या प्रमाणात सक्रिय होणार आहे. कोरोनाचे रुग्ण बरे होताहेत हे बाब समाधानकारक असल्याचंही आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी सांगितलं आहे. कोरोनाचे दोन रुग्ण अतिदक्षता कक्षात असून, इतरांची प्रकृती स्थिर असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. माणुसकीने वागा, सतर्कता बाळगा, सुरक्षित राहा, अन्य जिल्ह्यातील नागरिकांकडे संशयाने पाहू नका, धार्मिक स्थळांमध्ये गर्दी टाळा आणि गावातील परिजनांना घरी येऊ द्या, त्या आळा घालू नका, असंही राजेश टोपे म्हणाले आहेत.
खासगी डॉक्टरांनी बाह्यरुग्ण विभाग बंद केलं असून, वैद्यकीय सेवा अत्यावश्यक आहेत, त्या सेवा देण्यात येणार आहेत. वैद्यकीय सेवेवर निर्बंध नाहीत, त्यामुळे सामान्यांना सेवा द्यावी लागणार आहे. कोरोना बरा होऊ शकतो, 106 रुग्णांपैकी केवळ दोघांची स्थिती गंभीर असून, 15 जणांना डिस्चार्ज मिळू शकतो. पुणे, मुंबईतील नागरिकांकडे संशयाने बघू नका, असं आवाहनही टोपेंनी केलं आहे.