Coronavirus: संकट वाढतंय! एकाच दिवशी राज्यातील १२ जणांना कोरोनाची बाधा; आकडा पोहोचला ६४ वर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 06:11 PM2020-03-21T18:11:43+5:302020-03-21T18:12:25+5:30

Coronavirus: आयसीएमआरने प्रयोगशाळा चाचणीचे निकष बदलले; संसर्गाच्या सामाजिक प्रसाराची चाचपणी सुरु

Coronavirus state reports 12 fresh cases in one days total count reaches 64 in Maharashtra kkg | Coronavirus: संकट वाढतंय! एकाच दिवशी राज्यातील १२ जणांना कोरोनाची बाधा; आकडा पोहोचला ६४ वर

Coronavirus: संकट वाढतंय! एकाच दिवशी राज्यातील १२ जणांना कोरोनाची बाधा; आकडा पोहोचला ६४ वर

Next

मुंबई: राज्यातलं कोरोनाचं थैमान वाढताना दिसतंय. आज राज्यात कोरोनाचे एकूण १२ नवीन रुग्ण आढळले असून यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६४ झाली आहे.  आज आढळलेल्या १२ रुग्णांपैकी ८ रुग्ण मुंबई येथील तर २ जण पुणे येथील आहेत. यवतमाळ आणि कल्याणमधील प्रत्येकी एकाला कोरोनाची लागण झालीय. 

मुंबईत आढळलेल्या ८ रुग्णांपैकी ६ जण गेल्या काही दिवसांमध्ये परदेशातून परतले आहेत, तर एक जण विमानतळावर काम करणारा कर्मचारी आहे. तसेच आणखी एक रुग्ण गुजरातमध्ये प्रवास केलेला आहे. यवतमाळ येथील असणारा पण मुंबईत भरती असलेल्या रुग्णाने कांगो देशाचा प्रवास केलेला आहे. कल्याण येथील करोना बाधित रुग्ण हा दोन दिवसांपूर्वी बाधित आढळलेल्या आणि दुबई प्रवासाचा इतिहास असलेल्या उल्हासनगर येथील तरुणीचा भाऊ आहे. तो स्वतः ही बहिणीसोबत दुबईला गेला होता. पुणे येथील २५ वर्षाच्या बाधित तरुणाने इंग्लंड आणि आयर्लंड येथे प्रवास केलेला आहे. दरम्यान कुठलाही परदेश प्रवासाचा इतिहास नसलेली एक ४१ वर्षाची पुण्यातील महिला करोना बाधित आढळलेली आहे. या महिलेला कोरोनाची लागण कशी झाली याची कारणमीमांसा तिच्या साथरोगशास्त्रीय अन्वेषणानंतर स्पष्ट होईल. दरम्यान आयसीएमआरने प्रयोगशाळा चाचणीचे निकष बदलले असून संसर्गाच्या सामाजिक प्रसाराची चाचपणी सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. राजधानी मुंबईतल्या कोरोनाबाधितांची संख्या १९ इतकी आहे. तर पुण्यात ११, पिंपरी चिंचवडमध्ये १२, नागपूर, यवतमाळ, कल्याणमध्ये प्रत्येकी ४, नवी मुंबईत ३, अहमदनगरमध्ये २ आणि पनवेल, ठाणे, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरीत कोरोनाचा प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. 

राज्यात आज एकूण २७५ परदेशातून आलेले प्रवासी सर्वेक्षणाखाली दाखल झाले आहेत.    राज्यात आजपर्यंत बाधित भागातून एकूण १८६१ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत १५९२ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी १२०८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ६४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. 

नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे.

कोरोना आजार होण्याच्या भितीने अनेकांनी आपल्याकडील पाळीव प्राणी सोडून देण्यास सुरुवात केली आहे, अशा तक्रारी हेल्पलाईनवर प्राप्त होत आहेत. पाळीव प्राण्यांपासून करोना संसर्ग झाल्याची कोणतीही उदाहरणे नाहीत, त्यामुळे लोकांनी घाबरुन आपले पाळीव प्राणी सोडून देऊ नयेत, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.       

Web Title: Coronavirus state reports 12 fresh cases in one days total count reaches 64 in Maharashtra kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.