CoronaVirus ‘ते’ तबलिगी समोर न आल्यास कठोर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 05:53 AM2020-04-07T05:53:19+5:302020-04-07T05:54:01+5:30
गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती; मोबाइल स्विच आॅफ केलेल्यांचाही सुरू आहे शोध
विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तबलिगी जमातीचे जे लोक दिल्लीच्या मरकजहून परतले त्यांच्यापैकी महाराष्ट्रात परतलेल्या १,३५५ जणांची ओळख पटविण्यात आली आहे. त्यापैकी १३०० जणांच्या आवश्यक चाचण्या करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत वा त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. जे लोक स्वत:हून हजर होणार नाहीत त्यांचा आम्ही शोध घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा गृहमंत्री आनिल देशमुख यांनी दिला आहे.
‘लोकमत’शी बोलताना देशमुख म्हणाले की, त्यांच्यापैकी ५०-५५ लोक असे आहेत की ज्यांना अद्याप ताब्यात घेता आलेले नाही किंवा ते स्वत:हून हजर झालेले नाहीत. बहुतेकांनी मोबाईल स्विच आॅफ केलेले आहेत. त्यामुळे त्यांना शोधण्यात अडचणी येत आहेत. मोबाईल स्विच आॅफ असला तरी त्याचा ठावठिकाणा आजकाल काढता येतो. सायबर सेलच्या माध्यमातून तसे प्रयत्न केले जात आहेत. लवकरच त्याला यश येईल. दिल्लीच्या मरकजमध्ये महाराष्ट्रातून जे लोक गेले होते त्यांची नावे, पत्ते आम्ही दिल्लीतून मिळवले, त्यानुसार शोध मोहीम राबविली. काहीजण स्वत:हून पोलीस व आरोग्य यंत्रणेकडे हजर झाले व त्यांनी सहकार्य केले.
लाठी वापरण्यास भाग पाडू नका
लॉकडाऊनच्या काळात बंदी आदेश मोडून लोक बेफाम फिरत असतील तर लाठी चालवावीच लागेल, याचा देशमुख यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले, बेफाम लोकांनी पोलिसांवर हल्ल्याच्या ४८ घटना घडल्या आहेत. त्यात शंभरावर लोकांना अटक करण्यात आली.
बंदी मोडणाऱ्या नागरिकांची ७,५७० वाहने जप्त केली आहेत. ६६ लाख रुपयांचा दंडही आकारला आहे.
११ हजार कैद्यांची पॅरोलवर सुटका
कारागृहात असलेले ११ हजार आरोपी व कैदी यांच्या पॅरोलबाबतही सर्व ६० कारागृहांना निर्देश देऊन कैद्यांच्या गुन्हे व झालेल्या शिक्षेच्या अनुषंगाने पॅरोलवर सोडण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी असे सूचित केले. त्यानुसार हे कैदी पॅरोलवर सुटत आहेत.
सायबर गुन्ह्यास अटकाव
क्वारंटाईनबाबत जे चुकीचे संदेश समाज माध्यमाद्वारे पसरविण्यात येत होते त्यांनाही आळा बसला आहे. या चुकीच्या संदेशांबाबत ३४७ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे . तसेच भादविच्या कलम १८० नुसार २३ हजार १२६ घटनांची नोंद झाली आहे.
कोरोनासंदर्भात समाज माध्यमावर होत असलेल्या अपप्रचारास अटकाव करण्याचे निर्देश दिल्यामुळे यात एप्रिल फुलसारख्या संदेशांनाही
रोख लागला.