Coronavirus: बिकट परिस्थितीवर जिद्दीने मात; पाय नसतानाही कोरोनाशी लढणारा रिक्षावाला!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 12:57 AM2020-07-03T00:57:11+5:302020-07-03T13:37:41+5:30
लॉकडाऊन शिथिल झाल्यावर रिक्षाचालवून केला कुटुंबाचा उदरनिर्वाह
नारायण बडगुजर
पिंपरी : कोरोना महामारी व लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग-व्यवसाय बंद पडलेत. हजारो तरुण बेरोजगार झालेत. नैराश्याच्या गर्तेत जाऊन अनेकांनी आपलं जीवन संपवल्याचे दुर्दैवी प्रकारही घडत आहेत. अशा वेळी, अपयशानं खचून गेलेल्या, नैराश्याला कवटाळून बसलेल्या तरुणांना पिंपरी-चिंचवडमधील एका रिक्षाचालकाची कहाणी नवं बळ देणारीच आहे. दोन्ही पायांनी अपंग असलेला रिक्षाचालक कोरोना संकटाला धीराने सामोरा जात आहे. बिकट परिस्थितीवर त्यानं जिद्दीनं, परिश्रमानं मात केली आहे.
लॉकडाऊन शिथिल होताच पिंपरी-चिंचवड शहरात रिक्षा व्यवसाय पुन्हा सुरू करून स्वाभिमानाने तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. नागेश काळे असे त्या २९ वर्षीय रिक्षाचालकाचे नाव आहे.
चिखली येथील मोरेवस्ती येथे आई व पत्नीसह ते भाडेतत्त्वावरील खोलीत राहतात. त्यांचे मूळ गाव परभणी असून, १५ वर्षांपूर्वी त्यांचे वडील रोजगाराच्या शोधात पिंपरी-चिंचवड शहरात आले. तेव्हापासून काळे कुटुंब मिळेल ते काम करतात. नागेश काळे यांनीदेखील काही कंपन्यांमध्ये कंत्राटी तत्त्वावर काम केले. त्यानंतर त्यांनी भाडेतत्त्वावर रिक्षा घेऊन रिक्षा चालविण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यात त्यांना यश आले. त्यामुळे त्यांनी स्वत:ची रिक्षा खरेदी केली. परमिट काढले. दरम्यान सात वर्षांपूर्वी रेल्वे अपघातात त्यांचे दोन्ही पाय गेले.
त्यांच्या पत्नीने मॉलमध्ये काम सुरू केले. घरखर्चाला हातभार लागला. मात्र, बेरोजगारीच्या विचाराने नागेश अस्वस्थ होत असत. पायावरील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात गेले. तेथून परत येत असताना मित्राला सोबत घेऊन रिक्षा चालविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना बरे वाटले. सराव केला. पाय नसले तरी रिक्षा चालविता येऊ शकते, हे समजले. त्यामुळे त्यांचा आनंद आणि आत्मविश्वासदेखील द्विगुणित झाला. त्यांनी रिक्षात तांत्रिक बदल करून घेतले. पायाचा ब्रेक हँडलला जोडून घेतला. लॉकडाऊनच्या काळात दररोज आठ ते नऊ तास रिक्षा चालवून रोज ३०० ते ५०० रुपये मिळवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.
मीही निराश झालो होतो, पण...
कोशिश करने वालों की हार नही होती, हे आपल्या कृतीतून सिद्ध करणाऱ्या नागेश काळे यांनी 'लोकमत'कडे आपलं मनोगत अगदी मोकळेपणानं व्यक्त केलं. ''कोरोना काळात माझ्यासारख्या अनेक अपंग व्यक्ती आत्मसन्मानाने उभं राहण्यासाठी धडपड करीत आहेत. अपंग असल्यामुळे अनेक जण सहानुभूती दाखवितात. मात्र त्यापेक्षाही जास्त कामाची गरज आहे. लॉकडाऊनमुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय ठप्प झाला. पुरेसे प्रवासी नसल्याने मोठे नुकसान होते. त्यामुळे माझ्यासारख्या रिक्षाचालकांना नियमित प्रवासी भाडे मिळणे आवश्यक आहे'', याकडे त्यांनी लक्ष वेधलं. लॉकडाऊन दरम्यान पिंपरी - चिंचवड, पुण्यासह राज्यात सुमारे आठ रिक्षाचालकांनी आत्महत्या केल्या. हे थांबले पाहिजे. रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावले. त्यामुळे काही काळ मला देखील नैराश्य आले होते. मात्र, कुटुंबांच्या जबाबदारीने मला स्वस्थ बसू दिले नाही. तसाच आघात कोरोना महामारीने केला. लाॅकडाऊन शिथील झाले तरी पहिल्या टप्प्यात रिक्षा चालविण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे भाजीपाला विक्री केली. त्यातून दोन पैसे मिळविले, असं नागेश यांनी सांगितलं.
लॉकडाऊन आणखी शिथील झाला आणि त्यानंतर काळे यांनी त्यांची रिक्षा रस्त्यावर आणली. सुरुवातीच्या टप्प्यात प्रवासी नसल्याने कसरत झाली. मात्र तरीही काळे थांबले नाहीत. धावत आहेत, कारण आयुष्याच्या खडतर प्रवासात कधीही पंक्चर न होणाऱ्या त्यांच्या इच्छाशक्तीला रिक्षाच्या तीन चाकांची जोड आहे.
आपल्या शरीराचे अवयव कमी झाले, मात्र मन खंबीर आहे. लॉकडाऊन सर्वांसाठीच होता. निराश न होता सर्वांनी संकटावर मात करावी. त्याचा स्वीकार करून मास्कसह सॅनिटायजेशनची काळजी घ्यावी. त्यानुसार आपल्या कामातही बदल करावा लागेल, पण काम थांबवून चालणार नाही, असं आवाहन नागेश काळे यांनी सगळ्यांनाच केलं.
(फेसबुकने या उपक्रमासाठी आमच्यासोबत भागीदारी केली आहे, मात्र या मजकुरावर त्यांचं कुठलंही संपादकीय नियंत्रण अथवा प्रभाव नाही.)