CoronaVirus घर गाठण्यासाठी केली ४५० किमी पायपीट; विद्यार्थ्याचा वाटेतच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 05:43 AM2020-04-05T05:43:03+5:302020-04-05T05:44:28+5:30
बालासुब्रमणी लोगेश असे त्याचे नाव असून तो तमिळनाडूतील नमक्कलचा मूळ रहिवासी आहे.
हैदराबाद : कोरोना साथीमुळे लागू केलेल्या टाळेबंदीमुळे अस्वस्थ झालेल्या एका २२ वर्षीय विद्यार्थ्याने वर्ध्याहून निघून मिळेल त्या वाहनाने, प्रसंगी पायी चालत तमिळनाडूतील आपल्या घराकडे कूच केले. गेल्या दहा दिवसांच्या प्रवासात सुमारे ४५० किमी अंतर पार केल्यानंतर हृदयविकाराचा झटका येऊन हा विद्यार्थी बुधवारी रात्री वाटेतच मरण पावला.
बालासुब्रमणी लोगेश असे त्याचे नाव असून तो तमिळनाडूतील नमक्कलचा मूळ रहिवासी आहे. कृषी उत्पादनाशी संबंधित एका प्रशिक्षण कार्यक्रमासाठी तो वर्धा येथे आला होता. २१ दिवसांच्या टाळेबंदीमुळे त्याने एका गटाबरोबर मजल दरमजल करीत घर गाठण्याचे ठरविले. दहा दिवसांच्या प्रवासानंतर हा गट तेलंगणातील बोवेनपल्ली येथे पोहोचला असता तेथील बाजारपेठेत पोलिसांनी बुधवारी दुपारी त्यांना अडविले. या साऱ्या लोकांची रवानगी एका हॉलमध्ये उभारलेल्या तात्पुरत्या निवारा केंद्रात करण्यात आली. त्यांना जेवणही देण्यात आले. कोरोनाच्या साथीमुळे संचारबंदी लागू असून तुम्हाला पुढच्या प्रवासाला जाता येणार नाही, असे पोलिसांनी या लोकांना बजावले.
या निवारा केंद्रात बुधवारी रात्री बालासुब्रमणी लोगेश याला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालातील निष्कर्षात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
निर्धार ठरला जीवघेणा
वर्ध्याहून निघालेल्या बालासुब्रमणी व त्याच्या सोबतच्या लोकांनी जीवनावश्यक वस्तू बरोबर बाळगून प्रवासाला सुरुवात केली होती. ट्रक किंवा मिळेल त्या वाहनाने ते प्रवास करत होते. प्रसंगी पायी चालत अंतर कापत होते. हा प्रवास व घरी पोहोचण्याचा निर्धार ज्याच्यासाठी जीवघेणा ठरला. बालासुब्रमणी याचा मृतदेह शववाहिनीतून तमिळनाडूला त्याच्या गावी रवाना करण्यात आला.