Coronavirus: महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढण्याचा टास्क फोर्सचा अंदाज, आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केलं नियम पाळण्याचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 06:27 PM2021-12-21T18:27:35+5:302021-12-21T18:27:53+5:30
Coronavirus in Maharashtra : महाराष्ट्रामध्ये फेब्रुवारी महिन्यात Omicron Variantचे रुग्ण वाढतील, अशी शक्यता टास्क फोर्सने वर्तवल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री Rajesh Tope यांनी दिली आहे.
मुंबई - गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्यानंतर सध्या देशातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र आता देशातील विविध भागात परसलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गामुळे कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये फेब्रुवारी महिन्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढतील, अशी शक्यता टास्क फोर्सने वर्तवल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
टास्क फोर्सने वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये फेब्रुवारी महिन्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. दरम्यान, ओमायक्रॉनचा संसर्ग वाढल्याने त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोरोनाबाबतचे नियम पाळणं गरजेचं आहे, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे. यासंदर्भातील वृत्त टीव्ही ९ मराठीने दिलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्रामध्ये कोरोनाची तिसरी लाट आलीच तर ती ओमायक्रॉन व्हेरिएंटचीच असेल. पण त्याबाबत फार घाबरण्याची गरज नाही कारण ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये हॉस्पिटलाईज होण्याचे प्रमाण फार कमी आहे. पण असं असलं तरी नाताळ आणि नववर्ष साजरं करताना काळजी घ्यावी, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं होतं.
देशात ओमायक्रॉनचा धोका वाढत असून, आतापर्यंत देशातील १२ राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे २०० हून अधिक रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण सर्वाधिक आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत ७७ रुग्ण बरे झाले आहेत.