CoronaVirus: थँक्यू महिंद्रा! केवळ ४८ तासांत बनविले व्हेंटिलेटरचे प्रारूप; खर्च अवघा ७५०० रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 06:48 PM2020-03-26T18:48:22+5:302020-03-26T18:49:37+5:30
CoronaVirus in Mumbai महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रांनीच ही आनंदाची वार्ता दिली आहे. कंपन्या बंद किंवा कमी कर्मचाऱ्यांवर अत्यावश्यक कामे सुरु ठेवण्यात आली आहेत. या वेळाचा सदुपयोग महिंद्राच्या इगतपुरी आणि मुंबईतील कर्मचाऱ्यांनी केला आहे.
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे देशाला पुढील काही दिवसांत वैद्यकीय उपकरणांची तीव्र गरज लागणार आहे. केंद्र सरकारने १९ मार्चला मास्क आणि व्हेंटिलेटरची निर्यात थांबविली आहे. तर आता सैन्य दलासाठी दारुगोळा, शस्त्रे पुरविणाऱ्या सरकारी फॅक्टरींना मास्क आणि व्हेंटिलेटर बनविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर महिद्रा आणि महिंद्रा या वाहन निर्मिती करणाऱ्या आघाडीच्या कंपनीकडून आनंदाची बातमी आली आहे.
महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रांनीच ही आनंदाची वार्ता दिली आहे. कंपन्या बंद किंवा कमी कर्मचाऱ्यांवर अत्यावश्यक कामे सुरु ठेवण्यात आली आहेत. या वेळाचा सदुपयोग महिंद्राच्या इगतपुरी आणि मुंबईतील कर्मचाऱ्यांनी केला आहे. कोणत्याही महामारीवेळी व्हेंटिलेटरची खूप मोठी गरज असते. मात्र हा व्हेंटिलेटर ५ ते १० लाखांपासून सुरू होतो. यामुळे बऱ्याच रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर ठेवले जात नाहीत. यामुळे रुग्णाचा जीवही धोक्यात येतो.
कोरोनाशी लढण्यासाठी मास्क आणि व्हेंटिलेटरची नितांत आवश्यकता आहे. मास्क एकवेळ कोणीही बनवू शकतो, परंतू व्हेंटिलेटर बनविणे सोपे काम नाही. यामुळे महिंद्रांच्या या दोन ठिकाणच्या टीमनी केवळ ४८ तासांमध्ये व्हेंटिलेटर बनवत आरोग्य यंत्रणेला खूप मोठा दिलासा दिला आहे. त्यांनी या व्हेंटिलेटरचे प्रारुप तयार केले असून याचा व्हिडीओ खुद्द आनंद महिंद्रांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे.
So, so proud of our Kandivali & Igatpuri teams who confined themselves to the factories & without sleep produced this in 48hrs. With humility, we will seek guidance from specialists on the usefulness of the device. Whatever the outcome, they have shown India fights back... pic.twitter.com/LrVXm4Acku
— anand mahindra (@anandmahindra) March 26, 2020
या इंजिनिअरांनी व्हेंटिलेटर काम कसे करतो, याची माहिती इंटरनेटवरून मिळविली आणि तसे पार्ट बनवून काही चआधीच उपलब्ध असलेले पार्ट वापरून हा व्हेंटिलेटर तयार केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा व्हेंटिलेटर बनविण्यासाठी त्यांना अवघा ७५०० रुपयांचा खर्च आला आहे.
आता यावर हे इंजिनिअर काम करणार असून असे आणखी तीन व्हेटिलेटर तयार केले जाणार आहेत. यामुळे कोरोनाशी झगडणाऱ्या रुग्णांना मोठी मदत मिळणार आहे. हे काम पुढील दोन ते तीन दिवसांत पूर्ण केले जाणार आहे.