पुढील ८ ते १० दिवस महत्त्वाचे; निवडणुकीबाबत मंत्री विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 11:45 AM2022-06-03T11:45:23+5:302022-06-03T11:45:51+5:30

निवडणुकीच्या माध्यमातून लोकांची गर्दी होणं, पुन्हा संसर्ग वाढणं यामुळे निवडणुका टाळता येतील का याचा विचार होईल असं त्यांनी सांगितले आहे.

Coronavirus: The next 8 to 10 days are important; Minister Vijay Vadettiwar's big statement regarding elections | पुढील ८ ते १० दिवस महत्त्वाचे; निवडणुकीबाबत मंत्री विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान

पुढील ८ ते १० दिवस महत्त्वाचे; निवडणुकीबाबत मंत्री विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान

Next

मुंबई - राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मुंबईत कोरोना रुग्णसंख्या तिपटीनं वाढली आहे. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रशासनाने लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन केले आहे. मात्र कोरोना रुग्णसंख्या वाढीचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर परिणाम होण्याचीही शक्यता आहे. याबाबत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केले आहे. 

मंत्री विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) म्हणाले की, पुढील ८-१० दिवस महत्त्वाचे आहेत. या दिवसांत कोरोना रुग्णसंख्या किती वाढतेय याचा आढावा घेतला जाईल. काय परिस्थिती निर्माण होईल त्यावर निर्णय घेतला जाईल. येणाऱ्या निवडणुकीला बराच कालावधी आहे. परंतु ऑगस्ट सप्टेंबरमध्ये कार्यक्रम ठरेल. कोरोना परिस्थिती तशी उद्भवली तर निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाला करावं लागेल असं त्यांनी सांगितले आहे. 

तसेच निवडणुकीच्या माध्यमातून लोकांची गर्दी होणं, पुन्हा संसर्ग वाढणं यामुळे निवडणुका टाळता येतील का याचा विचार होईल. आम्ही विनंती करू परंतु निवडणुका घ्यायच्या की नाही हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच आहे असंही स्पष्टीकरण विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे. त्यामुळे राज्यात होणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका वेळेवर होणार का? हा प्रश्न आता उभा राहत आहे. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, औरंगाबादसह राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका कोरोना आणि ओबीसी आरक्षणामुळे खोळंबल्या आहेत. 

१५ दिवस वाट पाहून मास्कसह निर्बंधांचा विचार

कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार १५ दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून असेल. रुग्ण वाढताना दिसले तर मास्क सक्तीसह अन्य निर्बंधांचा विचार केला जाईल, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी वर्षा निवासस्थानी झालेल्या कोरोनासंदर्भातील आढावा बैठकीत दिले. निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वत:हून शिस्त पाळावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

दीड महिन्यात सक्रिय रुग्णांची संख्या सात पटीने वाढून ४,५०० वर गेली आहे. मुंबईचा पॉझिटिव्हिटी दर ६% तर राज्याचा ३ टक्क्यांवर गेला आहे, असे आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. राज्य कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले, वाढत्या कोरोना संसर्गावर तज्ज्ञांचे बारकाईने लक्ष आहे. वाढता संसर्ग आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिजोखमीच्या गटातील व्यक्तींनी अधिक काळजी घेतली पाहिजे. त्यात गर्भवती, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. याखेरीज, कोरोना गेला ही मानसिकता बदलून मास्कचा वापर, गर्दीत वावर कमी, स्वच्छतेचे निकष आणि शारीरिक अंतर हे नियम पाळले पाहिजेत. शिवाय, लसीकरणाकडे दुर्लक्ष न करता वर्धक मात्रासुद्धा घेतली पाहिजे.
 

Web Title: Coronavirus: The next 8 to 10 days are important; Minister Vijay Vadettiwar's big statement regarding elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.