Coronavirus : मार्चच्या मध्यापर्यंत राज्यातील कोरोनाची तिसरी लाट बऱ्यापैकी ओसरेल, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 12:27 PM2022-02-13T12:27:46+5:302022-02-13T13:05:21+5:30
Coronavirus in Maharashtra : सध्या राज्यभरात कोरोना रुग्णसंख्येत रोज घट होत असून मार्चच्या मध्यावधी पर्यत तिसरी लाट बऱ्यापैकी ओसरेल अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात दिलीय
जालना - सध्या राज्यभरात कोरोना रुग्णसंख्येत रोज घट होत असून मार्चच्या मध्यावधीपर्यत तिसरी लाट बऱ्यापैकी ओसरेल अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात दिलीय.सध्या राज्यात मास्क मुक्ती केली जाणार नाही.त्यामुळे तूर्तास राज्यात मास्कमुक्ती बाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नसून जशी परिस्थिती येईल त्यानुसार निर्णय घेतला जाईल अशी माहिती देखील टोपे यांनी दिली आहे.
राजेश टोपे म्हणाले की, ज्यावेळी तिसऱ्या लाटेची सुरूवात झाली होती तेव्हा कमाल ४८ हजारांपर्यंत रुग्ण सापडत होते. ते कमी कमी होत आधी २५ हजार मग ६ हजार आणि आता अगदी कमी रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे साधारण मार्चच्या मध्यावधीपर्यंत कोरोनाची लाट बऱ्यापैकी ओसरलेली आपल्याला दिसेल, असं मला वाटतं. त्यामुळे निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून सध्या राज्यात लागू असलेले निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याची माहिती देखील टोपे यांनी दिली.
दरम्यान, राज्यात रुग्णसंख्या कमी होत असली तरी नागरिकांनी पहिल्या आणि दुसऱ्या डोसचं लसीकरण करून घेतलं पाहिजेे, असं आवाहन देखील टोपे यांनी केलं आहे. पाश्चात्य देशातील आणि आपल्याकडील परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळेे राज्यात तूर्तास मास्कमुक्ती होणार नाही, असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.