coronavirus :...मग सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ऑरेंज झोनमध्ये समावेश कशासाठी? नितेश राणेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 04:34 PM2020-04-19T16:34:40+5:302020-04-19T16:37:02+5:30
भाजपा आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ऑरेंज झोनमध्ये समावेश करण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई/सिंधुदुर्ग - कोरोनाचा एक रुग्ण सापडल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश ऑरेंज झोन करण्यात आला आहे. दरम्यान, भाजपा आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ऑरेंज झोनमध्ये समावेश करण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या 14 दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. मग जिल्ह्याचा ऑरेंज झोनमध्ये का समावेश करण्यात आलाय? असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे.
यासंदर्भात नितेश राणे यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात की, मागील १४ दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण सापडलेला नाही. जिल्ह्यातील जनता आणि प्रशासन एकजुटीने कोरोना रोखण्यात यशस्वी ठरत आहे. मग जिल्ह्याचा ऑरेंज झोनमध्ये कशासाठी समावेश करण्यात आलाय? आमच्या जिल्ह्याचाही ग्रीन झोनमध्ये समावेश झाला पाहिजे.
राज्यात कोरोनामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध जिल्ह्यांची कोरोनाच्या प्रभावानुसार रेड, ऑरेंज आणि ग्रीन अशा तीन प्रकारात विभागणी करण्यात आहे. पैकी कोरोनाचे 15 हून जास्त रुग्ण सापडलेल्या जिल्ह्यांचा समावेश हा रेड झोनमध्ये करण्यात आला आहे. तर 1 ते 15 रुग्ण असलेल्या भागांचा समावेश ऑरेंज झोनमध्ये करण्यात आला आहे. तर एकही रुग्ण असलेल्या जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोन करण्यात आला आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा एक रुग्ण सापडला होता. मात्र हा रुग्ण आता बारा झाला आहे. तसेच यानंतर जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही.