Coronavirus : विदर्भात आणखी तीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह; दुबई, अमेरिकेवरून परतले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 04:05 AM2020-03-15T04:05:42+5:302020-03-15T04:06:01+5:30
पुण्यापाठोपाठ विदर्भात रुग्ण सापडल्याने उपराजधानीतील प्रशासन अलर्ट झाले आहे.
नागपूर/पुणे - विदर्भात यवतमाळमध्ये दोन आणि नागपूरमध्ये एक अशा तिघांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. बाधित तिघेही रुग्ण अमेरिकेवरुन परतले होते. यामुळे विदर्भातील कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या आता सहा झाली आहे.
पुण्यापाठोपाठ विदर्भात रुग्ण सापडल्याने उपराजधानीतील प्रशासन अलर्ट झाले आहे. दरम्यान, पुण्यातील नायडू रुग्णालयात १० बाधित रुग्णांवर उपचार सुरु असून संशयित रुग्णांची संख्या वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पुण्यातील कोचिंग क्लासेस, अभ्यासिका आणि सार्वजनिक उद्याने बंध ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील नऊ लोकांचा समूह दुबई येथे प्रवासाला गेला होता. १ मार्च रोजी ते यवतमाळ येथे परतले. शनिवारी त्यांच्या रक्त नमुन्यांचा अहवाल मिळाल्यानंतर दोघांना लागण झाल्याचे निष्पन्न झाले. नागपुरात अमेरिका प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या दोन पुरुष रुग्णांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे शुक्रवारपर्यंत समोर आले होते. यांच्यासोबत अमेरिका प्रवासाला गेलेल्या आणखी चार संशयिताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यांच्या नमुन्याचा अहवाल शनिवारी प्राप्त झाला. यात ४३ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या रुग्णाची पत्नीलादेखील लागण झाल्याचे याअगोदरच स्पष्ट झाले आहे. तिघांवर मेडिकलमध्ये तर एका रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुण्यात खासगी अभ्यासिका व कोचिंग क्लासही बंद ठेवण्यात येणार आहेत. अनेक विद्यार्थी आताच पुणे सोडून गावी जात आहेत. तसेच शाळा व महाविद्यालयांमध्ये अभ्यासिका व क्लासही बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
नागपुरातील रुग्णालयातून ४ संशयित रुग्णांचे पलायन
नागपूर : जागतिक आरोग्य संघटनेने महामारी घोषीत केलेल्या कोरोना विषाणूचे चार संशयित रुग्ण शुक्रवारी रात्री उशीरा इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथून निघून गेल्याने सर्वांचीच पाचावर धारण बसली होती. परंतू शनिवारी रात्री त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आणि संशयित रुग्णही परतले.
कोरोना विषाणूची लागण झालेल्या व संशयित रुग्णांसाठी मेयोकडे एकच वॉर्ड आहे. २० खाटांच्या या वॉर्डात सध्या एक ४५ वर्षीय पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहे. शुक्रवारी एकूण सात संशयित रुग्ण दाखल झाले होते. त्यातील दोघांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले, तर उर्वरीत संशयित पाच रुग्णांचे नमुने सायंकाळी घेतल्याने त्याचा अहवाल दुसऱ्या दिवशी येणार होता.
संबंधित रुग्ण शनिवारी परतल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडला. विशेष म्हणजे त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
तिघे रुग्णालयात दाखल
कोरोनामुळे जिल्हा रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आलेल्या तीन संशयितांनी शनिवारी सायंकाळी रुग्णालयातून पलायन केले होते. त्या रुग्णांना परत जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे.