coronavirus: महाराष्ट्रातील कोरोनाबळींची संख्या ५० हजारांपार, राज्यात अद्याप ५३ हजार अॅक्टिव्ह रुग्ण
By बाळकृष्ण परब | Published: January 9, 2021 10:07 PM2021-01-09T22:07:41+5:302021-01-09T22:12:44+5:30
coronavirus News : राज्यातील कोरोनाच्या फैलावाचा आकडा आता बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. मात्र असे असले तरी अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही.
मुंबई - राज्यातील कोरोनाच्या फैलावाचा आकडा आता बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. मात्र असे असले तरी अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही. दरम्यान, गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनामुळे ५७ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबळींची संख्या ५० हजारांच्या पुढे गेली आहे. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत ५० हजार २७ जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे ३ हजार ५८१ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ही १९ लाख ६५ हजार ५५६ वर पोहोचली आहे. तर याच काळात ५७ जणांचा मृत्यू झाला. या दिवसभरात राज्यात २ हजार ४०१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात कोरोनाचे ५२ हजार ९६० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
Maharashtra reports 3581 new #COVID19 cases, 2401 discharges and 57 deaths today.
— ANI (@ANI) January 9, 2021
Total cases 19,65,556
Total recoveries 18,61,400
Death toll 50,027
Active cases 52,960 pic.twitter.com/g6tas3xo8z
देशामध्ये कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला असून, कोरोनाचे रुग्ण आणि एकूण कोरोना बळींमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे गेल्या एक दोन महिन्यांपासून राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत असून, कोरोनाची साथ नियंत्रणात आल्याचे संकेत मिळत आहे.
दरम्यान, देशभरात कोरोनाविरोधातील लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरुवात होणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुमारे आठ लाख आरोग्य सेवकांना पहिल्या टप्प्यामध्ये कोरोनाविरोधातील लस दिली जाईल. तीन महिन्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.