Coronavirus : संसर्गाच्या भीतीने हरिनाम सप्ताहांची परंपरा खंडित, कीर्तन-प्रवचनकार घरीच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 01:38 AM2020-03-24T01:38:49+5:302020-03-24T06:04:37+5:30
Coronavirus : यंदा मात्र कोरोनाच्या जीवघेण्या साथरोगामुळे ३१ मार्चपर्यंत जमावबंदी आहे आणि आता तर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाले आहेत. गर्दी टाळण्यासाठी कीर्तनकारांनींही कुठेही कीर्तन न करण्याचा निर्णय घेतला आहे.
- प्रकाश महाले
राजूर (जि. अहमदनगर) : वारकरी संप्रदायाची भगवी पताका खांद्यावर घेत राज्यातील गावागावांमध्ये सुरू असलेली हरिनाम सप्ताहांची अनेक वर्षांची परंपरा यंदा कोरोनाच्या संकटामुळे खंडित झाली आहे. कीर्तन-प्रवचनकार घरीच असून त्यांनी स्वत:ला शेती व घरकामात गुंतवून घेतले आहे. अनेक कीर्तनकार-प्रवचनकार सोशल मीडियाद्वारे आपली कीर्तन-प्रवचन सेवा देत आहेत. अनेकांची प्रवचने फेसबुकवरही लाइव्ह सुरू आहेत.
फाल्गुन तसेच चैत्र महिन्यांमध्ये हरिनाम सप्ताह, जत्रा-यात्रा, मेळावे, उत्सव मोठ्या प्रमाणात असतात. या काळात गावोगावी हरिनाम सप्ताहांची संख्याही मोठी असते. कीर्तनकार-प्रवचनकारही व्यग्र राहतात.
यंदा मात्र कोरोनाच्या जीवघेण्या साथरोगामुळे ३१ मार्चपर्यंत जमावबंदी आहे आणि आता तर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाले आहेत. गर्दी टाळण्यासाठी कीर्तनकारांनींही कुठेही कीर्तन न करण्याचा निर्णय घेतला आहे.
अकोले तालुक्यात निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्यासह शंभर कीर्तनकार आहेत. वेगवेगळ््या तारखांना असलेल्या हरिनाम सप्ताहात काकड आरती, गाथा पारायण व भजन, प्रवचन, कीर्तन, गाव पंक्ती असे दिनक्रम असतात. अख्खे गावच या काळात भक्तिरसात न्हाऊन निघते. तालुक्यातील कीर्तनकार बाहेर जातात आणि दूरवरचे कीर्तनकार सेवेसाठी गावी येतात. काही कीर्तनकार सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या धोक्याबाबत स्थानिकांचे प्रबोधन करीत आहेत. हरिनाम सप्ताहांची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी काही गावांमध्ये सप्ताह कालावधीत केवळ एकच विणेकरी मंदिरात उभा राहून अखंडनाम घेणार आहे. इतर कार्यक्रम रद्द केले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रत्येक आदेशाचे आपण पालन करीत असल्याचे सर्वच कीर्तनकार सांगत आहेत.
इंदोरीकरांचे आवाहन
इंदोरीकर महाराज यांनीही राज्याच्या विविध भागातील नियोजित सर्व कीर्तन ३१ मार्चपर्यंत रद्द केले आहेत. असाच निर्णय राज्यातील इतर कीर्तनकारांनीही घेतला आहे. कोरोनाचे संकट हद्दपार होईपर्यंत घरीच आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी माझे कीर्तनही काही दिवस बंद ठेवले आहे. नागरिकांनीही कामाशिवाय बाहेर पडू नये. घरीच बसून कोरोनाविरोधात लढा द्यावा, असे आवाहन इंदोरीकर यांनी केले आहे.
आम्ही सरकारसोबत : सरकारच्या सोबत आम्ही सर्व वारकरी आहोत. सर्व नागरिकांनी आपले आरोग्य सांभाळावे. कोरोनाचे संकट लवकर दूर कर असे साकडे आम्ही पांडुरंगाकडे घालत आहोत. सध्या आम्ही बहुतांश कीर्तनकारांनी स्वत:ला शेतात आणि कुटुंबात अडकून घेतले आहे.
- विश्वनाथ शेटे, वारकरी संघटनेचे अध्यक्ष