coronavirus: पनवेलहून मध्य प्रदेश, ओडिशा राज्यात दोन विशेष रेल्वे रवाना होणार; मार्ग मोकळा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 06:03 AM2020-05-10T06:03:29+5:302020-05-10T06:04:01+5:30
शनिवारी १ हजार १४३ मजुरांना घेऊन ओडिशा राज्यात रवाना झाली. त्याचबरोबर रात्री एक विशेष रेल्वे बाराशे मजुरांना घेऊन मध्यप्रदेश राज्यात जाणार आहे.
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सुमारे एक हजार २०० मजुरांना ओडिशा राज्यात गुरुवारी घेऊन जाणाऱ्या विशेष रेल्वेला ओडिशा सरकारने परवानगी नाकारल्याने जिल्हा प्रशासनाला ही रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. मात्र आता हिच रेल्वे शनिवारी १ हजार १४३ मजुरांना घेऊन ओडिशा राज्यात रवाना झाली. त्याचबरोबर रात्री एक विशेष रेल्वे बाराशे मजुरांना घेऊन मध्यप्रदेश राज्यात जाणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातून तीन विशेष रेल्वे मध्यप्रदेश आणि बिहार राज्यात या आधीच सोडण्यात आल्या होत्या.
दोन दिवसांपूर्वी ओडीसा उच्च न्यायालयाने परराज्यातून येणाºया नागिकांना राज्यात घेण्यास मनाई केली होती. या निर्णयाच्या विरोधात ओडिसा सरकारने सर्वाच्य न्यायालयात दाद मागीतली होती. त्यानुसार सर्वाच्य न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली. त्यामुळे आता ओडिशा राज्यात जाणाऱ्यांसाठी मार्ग मोकळा झाला आहे
.
केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार देशभरात लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी अडकून पडलेल्या परराज्यातील मजूर, विद्यार्थी, पर्यटक आणि यात्रेकरु ंना त्यांच्या राज्यात, जिल्ह्यात जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार परराज्यातील मजूरांना टप्प्याटप्प्याने त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
ओडिशा हायकोर्टाने कोव्हीड-१९ टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतरच ओरीसा राज्यात या मजुरांना प्रवेश देण्याचे आदेश काढले. त्यामुळे अचानक ट्रेन रद्द करण्याचा निर्णय घेण्याची वेळ येथील प्रशासनावर आली. ओरिसा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या सर्व नागरिकांची कोव्हीड-१९ टेस्ट करणे शक्य नव्हते. त्यामुळे ओरिसा सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने ओरिसा उच्च न्यायालयाचे आदेश ‘व्यवहार्य’ नसल्याचे मत व्यक्त करत उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिल्याची माहिती अतिरीक्त जिल्हाधिकारी भरत शितोळे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
जिल्ह्यात अडकलेल्या मजुरांना घेऊन आणखी एक जाणारी विशेष ट्रेन पनवेल येथून रात्री आठ वाजता मध्यप्रदेशला सोडण्यात येणार आहे. त्यामुळे या मजुरांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये अलिबागमधील १५६ मजुरांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे महाड-२३, माणगाव-२९ म्हसळा-२२, पेण-६७३, पोलादपूर-१९ रोहो-१४३, श्रीवर्धन-६, सुधागड-६४ तळा तालुक्यातील ८ अशा एकूण एक हजार १४३ मजुरांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाचे चिटणीस विशाल दौंडकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.