Coronavirus : करण जोहरच्या घरी झालेल्या कोरोनाच्या सुपरस्प्रेडर ठरलेल्या पार्टीत होता राज्य सरकारमधील एक मंत्री? भाजपा नेते आशिष शेलार यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 02:55 PM2021-12-16T14:55:58+5:302021-12-16T15:04:34+5:30
Coronavirus in Maharashtra : कोरोनाची सुपरस्प्रेडर ठरलेल्या Karan Johar च्या घरी झालेल्या पार्टीमध्ये राज्य सरकारमधील एक मंत्रीही सहभागी झाला होता, असा गंभीर आरोप BJP नेते Ashish Shelar यांनी केला आहे.
मुंबई - बॉलिवूड निर्माता, दिग्दर्शक करण जोहर याच्या घरी झालेली एक पार्टी कोरोनाची सुपर स्प्रेडर ठरली होती. या पार्टीत झालेल्या अनेक कलाकारांना तसेच त्यांच्या निकटवर्तीयांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. दरम्यान, कोरोनाची सुपरस्प्रेडर ठरलेल्या या पार्टीमध्ये राज्य सरकारमधील एक मंत्रीही सहभागी झाला होता, असा गंभीर आरोप भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला आहे. त्यानंतर आता आशिष शेलार यांचा रोख मंत्रिमंडळातील नेमक्या कोणत्या मंत्र्याकडे आहे, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आशिष शेलार म्हणाले की, करण जोहर याच्या घरी काही पार्टी झाली. या पार्टीमध्ये राज्य सराकरमधील कुणी मंत्री होता का, हा संशय बळावायचा नसेल, तर त्या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज महानगरपालिकेने जाहीर करावे. तसेच जर कुणी मंत्री त्या पार्टीत सहभागी झाला असेल, तर त्याने ते स्वत:हून जाहीर करावे, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. एकीकडे राज्यात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गाची भीती वाढत असताना आशिष शेलार यांनी केलेल्या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, करण जोहर याच्या घरी झालेल्या पार्टीनंतर सर्वप्रथम सीमा खानला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आले होते. ती गेल्या ८ डिसेंबरला करण जोहरच्या घरी गट टुगेदरसाठी गेली होती. या पार्टीत करीना कपूर खान, अमृता अरोराही उपस्थित होत्या. 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. ११ डिसेंबर रोजी सीमा खानचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर करीना खान आणि अमृता अरोरा यांचीही कोरोना चाचणी झाली. यात त्या दोघीही संक्रमित आढळल्या होत्या.
त्यानंतर महापालिकेने तात्काळ त्या राहत असलेल्या इमारती सील करीत तेथील रहिवाशी, घरकाम करणारे आणि जवळच्या संपर्कातील ११० जणांची कोविड चाचणी केली होती. बुधवारी या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. महापालिकेने मंगळवारी तातडीने त्या राहत असलेल्या चार इमारती सील करुन ११० लोकांची चाचणी केली होती. या चाचणीत एकाही रहिवाशाला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आलेले नाही. त्यामुळे सर्व रहिवाशांसह महापालिकेनेही सुटकेचा निःश्वास सोडला आहे.