coronavirus: सत्ताधारी घरात बसल्याने आम्ही फिरणार, देवेंद्र फडणवीस यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 06:29 AM2020-07-10T06:29:23+5:302020-07-10T06:30:07+5:30
जनतेच्या समस्या, अडचणी जाणून घेण्यासाठी कितीही गंभीर परिस्थिती असली तरी आम्ही त्यांच्यापर्यंत जाणारच आणि त्यांना दिलासा देणार, असा निर्धार व्यक्त करीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
जळगाव : कोरोनासारख्या गंभीर प्रसंगात जनतेला मदत करणे सोडून राज्यातील सत्ताधारी घरात बसले आहेत. त्यांना सर्वसामान्यांची चिंता नसली तरी आम्हाला आहे. जनतेच्या समस्या, अडचणी जाणून घेण्यासाठी कितीही गंभीर परिस्थिती असली तरी आम्ही त्यांच्यापर्यंत जाणारच आणि त्यांना दिलासा देणार, असा निर्धार व्यक्त करीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
फडणवीस यांनी सुरुवातीला कोविड रुग्णालयात पाहणी केली. सोबत आमदार गिरीश महाजन यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे खासदार, आमदार तसेच पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडून उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जळगाव जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यूदर चिंताजनक आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात तपासण्या (टेस्टिंग) वाढविण्याची गरज आहे. सध्या आयसीएमआरच्या निर्देशानुसार ज्या प्रमाणात टेस्टिंग व्हायला पाहिजे, टेस्टिंगचे अहवाल तीन-चार दिवस येत नसल्याने संसर्ग वाढून रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. त्यामुळे २४ तासांत अहवाल येणे आवश्यक आहे, अस त्यांनी सांगितले.
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
कोरोना रुग्णालयाची पाहणी करीत असताना भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अधिकाºयांची मोठी गर्दी उसळली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पत्रकारांशी संवाद साधतानाही फडणवीस यांच्या आजूबाजूला पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचीही मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.
महाविद्यालयीन परीक्षेचा पोरखेळ होऊ नये
औरंगाबाद : राज्यातील महाविद्यालये व विद्यापीठांतील परीक्षेविषयी पोरखेळ सुरू आहे. युवासेनेच्या आग्रहाखातर विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ न करता समन्वयातून परीक्षेचा प्रश्न सोडविण्यात यावा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालयातील अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यावर राज्य शासनाने परीक्षा घेणार नसल्याची भूमिका जाहीर केली आहे. यावर ते म्हणाले, देशातील इतर राज्यांत परीक्षा घेण्यात आल्यास आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या पदव्यांची किंमत राहणार नाही. युजीसीने परीक्षा तात्काळ घेण्याच्या सूचना केलेल्या नाहीत. कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर सोशल डिस्टन्स पाळून परीक्षा घेता येतील. मात्र, पॉलिटिकल इगोसाठी प्रकरण ताणले जात आहे. यात नुकसान विद्यार्थ्यांचे होणार आहे.