Coronavirus: लग्नसमारंभावर आधारित व्यवसाय अडचणीत; लॉकडाउनमुळे आर्थिक नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 11:21 PM2020-05-03T23:21:14+5:302020-05-03T23:21:41+5:30
केटरर्स, फुलविक्रेते, मंगल कार्यालये, मंडप डेकोरेटर्सला फटका
बाळासाहेब सावर्डे/गणेश चोडणेकर
रसायनी : देशात लॉकडाउन सुरू होऊन महिन्यापेक्षा अधिक कालावधी पूर्ण झाला. अत्यावश्यक उद्योगांव्यतिरिक्त अन्य मोठे व छोटे उद्योग बंद असल्याने ते आर्थिक नुकसानीला तोंड देत आहेत. तर लग्नसराई, इतर समारंभ होत नसल्याने याचा फटका फोटोग्राफर, केटरर्स, फुलविक्रेते, मंगल कार्यालये, मंडप डेकोरेटर्स अशा व्यावसायिकांना बसला आहे. हा हंगाम हातचा निघून गेला तर वर्षभर उदरनिर्वाह कसा करायचा? हा मोठा प्रश्न या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसमोर आहे.
मार्च ते जून हा कालावधी विवाह सोहळे, समारंभांचा असतो. ठरलेले विवाह काहींनी दिवाळीनंतर पार पाडण्याचे ठरविले, तर विवाह इच्छुकांनी पुढील वर्षीच लग्नगाठ बांधण्याचा निश्चय केलेला आहे. मात्र, या लग्नसमारंभावर आधारित व्यवसाय असणाऱ्यांचे हाल होत आहेत.
हल्लीच्या लग्नात ट्रेंडप्रमाणे फोटो अल्बम व व्हिडीओ शूटिंग के ली जाते. ७० ते ८० फोटोंचा चांगला अल्बम बनविण्यासाठी १८ ते २० हजार रुपये मोजावे लागतात. मंगल कार्यालयांना सुद्धा चार ते पाच तासांसाठी ३५ ते ५० हजार रु. मोजावे लागतात. आयोजकांच्या पैशांची बचत जरी झाली असली तरी लग्न रद्द केल्यानेपुष्पहार, फुले, मेनूप्रमाणे व ताटांवर हिशेब घेऊन भोजनाची व्यवस्था करणारे केटरर्स, मंगलाष्टके म्हणणारे गुरुजी (भटजी) या मंडळींना फटका बसला आहे. कोणतेही समारंभ, सोहळे नसल्याने ते घरीच बसून आहेत. त्यांचे मोठे आर्थिक नुकसान यंदाच्या हंगामात झाले आहे.
हंगाम संपत आल्याने छायाचित्रकारांचा उदरनिर्वाह कठीण
आगरदांडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी झालेल्या लॉकडाउनमुळे मुरुड तालुक्यातील शहरासह जिल्ह्यातील सुमारे ५७६ छायाचित्रकार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. हातावर पोट असल्याप्रमाणे छायाचित्रकारांना चिंता सतावत आहे.
मार्च ते जून महिन्यादरम्यान मोठ्या प्रमाणावर लग्नसोहळे आणि सार्वजनिक व घरगुती समारंभांचा हंगाम असतो. मात्र, यंदा कोरोनामुळे या हंगामावरील संकट अधिक गडद झाले आहे. छायाचित्रणाबरोबरच एडिटर, ग्राफिक डिझाइनर, फोटो एडिटर, एक्सपोजिंग त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यात अनेक व्यावसायिकांनी लाखो रुपये गुंतवणूक करून कॅमेरे, संगणक, ड्रोन आणि स्टुडिओ उभारले आहेत. याशिवाय यातून अनेकांना रोजगार मिळत होता. शहरी भागासह ग्रामीण भागातदेखील मोठ्या प्रमाणावर हौशी छायाचित्रकार आहेत. किंबहुना फोटोग्राफी हेच त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. दरवर्षी मार्च ते जून दरम्यान मोठ्या प्रमाणावर लग्नसमारंभाच्या आॅर्डर नोंदणी असल्याने सर्व छायाचित्रकारांनी नियोजन केले होते; परंतु कोरोना पार्श्वभूमीवर जारी
केलेल्या लॉकडाउनमुळे छायाचित्रकारांची आर्थिक कोंडी झाली आहे.
सध्या सोशल मीडिया आणि मोबाइलच्या जमान्यात फोटोग्राफी हरवत चालली आहे. यामुळे महागडी गुंतवणूक करूनही फोटो स्टुडिओ चालविणे कठीण झाले आहे. संचारबंदी असल्यामुळे दुकानेही बंद असून साखरपुडा, लग्न, वाढदिवस, ग्रहशांती यासारखे कार्यक्रम पुढे ढकलल्याने नोंदणी झालेल्या आॅर्डर रद्द होऊ लागल्या आहेत. इतरांप्रमाणे राज्य शासनाने व्यावसायिक छायाचित्रकारांना मदतीचा हात देण्याची मागणी होत आहे.