Coronavirus: महिलांची सामूहिक शक्ती; कोरोना काळात बचत गटांची सव्वाशे कोटींची उलाढाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 02:14 AM2020-08-23T02:14:25+5:302020-08-23T07:36:46+5:30
पाच महिन्यांत मास्क विक्रीतून तब्बल ११ कोटी, २६ लाखांची कमाई
समीर देशपांडे
कोल्हापूर : कोरोना काळात बचत गटाच्या महिलांनी पाच महिन्यांमध्ये तब्बल १२५ हून अधिक कोटींची उलाढाल केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून सध्या महिला बचत गटांचे काम जोरात सुरू आहे.
राज्याच्या ३४ जिल्ह्यांतील चार लाख सात हजार महिला बचत गटांशी जोडल्या गेलेल्या आहेत. मास्कची गरज ओळखून त्यांनी ते बनवायला घेतले. ८,४४४ बचत गटांतील ३३,५०० महिलांनी ९३.३५ लाख कापडी मास्क विकून ११ कोटी २६ लाख रुपयांची उलाढाल केली. तसेच २८ हजार ६७७ टन भाजीपाला, फळे, धान्याची विक्री करून त्यांनी २६ कोटी दोन लाख रुपयांची उलाढाल केली. पावसाळ््याच्या तोंडावर खते, बी-बियाण्यांची सामूहिक खरेदी करून ५६ कोटी १८ लाख रुपयांची उलाढाल केली, ज्याचा लाभ तीन लाख नऊ हजार कुटुंबांना झाला.
राज्यातील १४ लाख महिलांनी खरीप हंगाम आॅनलाईन प्रशिक्षणाचा लाभ घेतला. ‘माझी परसबाग’ संकल्पना मांडण्यात आली. यामध्ये ९३ हजार ११२ महिलांनी परसबागा बनवल्या. एक लाख २४ हजार अस्मिता सॅनिटरी नॅपकिनचा पुरवठा करून २९ कोटी ४९ लाख रुपयांची उलाढाल केली. ‘बँक सखी’च्या माध्यमातून दोन लाख खातेधारकांना ६५ कोटी रुपये उपलब्ध करून दिले.
राज्यातील महिला भगिनींनी मनात आणले त्या काय करू शकतात, त्याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे. कोरोनाच्या संकटकाळातही हातावर हात ठेवून न बसता या भगिनींनी केलेल्या या कामाला माझा सलाम. - हसन मुश्रीफ, ग्रामविकासमंत्री
आता ‘उमेद’च्या माध्यमातून महिला बचत गटांच्या माध्यमातून गुणात्मक काम करण्याचे सामूहिक प्रयत्न सुरू आहेत. आता पश्चिम महाराष्ट्रातील महिलांसाठी काही आणखी उत्पादन प्रकल्प राबवण्याचा आमचा विचार आहे. - आर. विमला मुख्य कार्यकारी अधिकारी,
ग्रामीण जीवनोन्नती अभियान, महाराष्ट्र