Coronavirus: उत्तर प्रदेशातील मजुरांची वाट बिकटच! आधी कोरोना टेस्ट करा मगच पाठवा, योगींची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 02:44 AM2020-05-05T02:44:11+5:302020-05-05T06:56:24+5:30
सर्वांची कोरोना तपासणी अशक्य
मुंबई : उत्तर प्रदेशातील लाखो मजूर लॉकडाउनमुळे महाराष्ट्रात अडकले असून त्यांच्या आरोग्य तपासणीची अट योगी आदित्यनाथ सरकारने घातल्याने या मजुरांच्या स्थलांतराचा प्रश्न बिकट बनला आहे.
सुरुवातीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या लोकांना घेण्याची तयारी दर्शवली होती; मात्र देशभरातून उत्तर प्रदेशात येणाऱ्यांची संख्या किमान एक कोटीच्या घरात आहे. एवढ्या लोकांच्या क्वारंटाइन आणि आयसोलेशनची यंत्रणा उत्तर प्रदेश सरकारकडे आज उपलब्ध नाही. त्यामुळे आता उत्तर प्रदेश सरकारने या लोकांना आपल्या राज्यात घेण्यासाठी वेगवेगळी कारणे पुढे करणे सुरू केले आहे.
उत्तर प्रदेश व महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंंगवर मीटिंंग झाली. त्यात आमच्याकडे पाठवणाऱ्यांची कोरोना टेस्ट करा, निगेटिव्ह रिपोर्ट असतील तरच त्यांना पाठवा. यादीसोबत त्यांचे रिपोर्टही जोडा, अशा अटी उत्तर प्रदेश सरकारने घातल्या. गेले ४० दिवस हे मजूर राज्यात सरकारने तयार केलेल्या निवास व्यवस्थेत आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाली असती तर त्या वेळीच ते लक्षात आले असते. त्यांची तपासणी करून त्यांना पाठविणे अशक्य आहे, अशी महाराष्ट्राची भूमिका एका अधिकाऱ्याने स्पष्ट केली.
राज्यात किमान २५ लाख लोक आहेत. एवढ्यांची कोरोना तपासणी करणे अशक्य आहे, असे मत मंत्री नवाब मलिक यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मुंबईत ४० दिवसांत ७० ते ८० हजार तपासण्या होऊ शकल्या. पंचवीस लाख लोकांच्या तपासण्या महाराष्ट्रात करायचे झाले तर त्यासाठी जो वेळ लागेल, तेवढा वेळ थांबण्यासाठी हे लोक तयार नाहीत, असेही मलिक यांनी स्पष्ट केले. मुंबईत १५ ते २० हजार टॅक्सीचालक आहेत जे स्वत:ची टॅक्सी घेऊन उत्तर प्रदेशला जाण्यासाठी तयार आहेत. अशा लोकांना घेण्यासही उत्तर प्रदेश सरकारने तूर्त सहमती दर्शवली नाही, असे मंत्रालयातील अधिकाºयांनी स्पष्ट केले.कर्नाटक सरकारनेदेखील हीच भूमिका घेतली आहे. कर्नाटकमधील काही लोक महाराष्ट्रात अडकले आहेत. त्यांचीदेखील तपासणी केल्याशिवाय त्यांना पाठवू नका, असे त्यांनी सांगितले.
‘आत्ताच लोकांना पाठवू नका’ : आंध्र प्रदेशमधून एक ट्रेन उत्तर प्रदेशमध्ये पोहोचल्यानंतर त्या लोकांना क्वारंटाइन करण्यासाठी ज्या ठिकाणी नेण्यात आले तेथे मोठा गोंधळ उडाला. परिणामी, तिथली सगळी व्यवस्था कोलमडून गेली. म्हणून महाराष्ट्रातून आत्ताच लोकांना पाठवू नका, असे पत्र उत्तर प्रदेश सरकारने महाराष्ट्राला पाठविले. त्यामुळे महाराष्ट्रातून जाणाºया रेल्वेवर आता मोठे प्रश्नचिन्ह तयार झाले आहे.