चिंताजनक! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या पाचशेपार, मुंबईत 300 हुन अधिक रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 12:47 PM2020-04-04T12:47:20+5:302020-04-04T12:55:20+5:30
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढू लागला असून, आज 47 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबधितांचा आकडा 537 वर पोहोचला आहे.
मुंबई - कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढू लागला असून, आज 47 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबधितांचा आकडा 537 वर पोहोचला आहे. काल राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 490 झाली होती. तर कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे.
आज मुंबईत 28, ठाणे 15, अमरावती 1, पुणे 2, पिंपरी-चिंचवडमध्ये 1 अशा एकूण 47 नव्या रुग्णांची नोंद झाली. राज्यातील एकूण रुग्णांच्या संख्येवर नजर टाकल्यास मुंबईत सर्वाधिक 306, पुण्यात 73, ठाणे आणि एमएमआर परिसरात 70, सांगली 25, अहमदनगर 20, नागपूर 16, बुलढाणा 5, यवतमाळ 4,सातारा आणि औरंगाबाद प्रत्येकी 3, कोल्हापूर आणि रत्नागिरी प्रत्येक 2 आणि सिंधुदुर्ग, गोंदिया, नाशिक, उस्मानाबाद, वाशीम, जळगाव आणि अमरावती येथे प्रत्येकी एका कोरोनाबधिताची नोंद झाली आहे.
राज्यातील कोरोनाचं संकट वाढताना दिसत आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या सरकारची चिंता वाढवणारी आहे. अशातच आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत कोरोनाचे ३ रुग्ण आढळून आल्याने खळबळ माजली आहे. धारावीत कोरोनाचं संक्रमण वाढलं तर कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढू शकते. त्यानंतर हे रोखणं सरकारसमोर आव्हान असणार आहे. त्याचसोबत मुंबईत सीआयएसएफच्या ६ जवानांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
शुक्रवारी मुंबईत कोरोनाचे ४३ नवीन रुग्ण आढळून आले होते. मागील २४ तासांत ६ रुग्णांचा जीव गेला. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २६ इतकी झाली आहे. त्याचसोबत उपचारानंतर डॉक्टरांनी ५० रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याचं सांगितलं आहे. मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. मुंबईची लोकसंख्या अधिक आहे. महापालिकेने शहरातील काही भाग कोरोना प्रभावित जाहीर केले आहेत. या परिसरातून कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत.