Coronavirus: 'गडबडून जाऊ नका, संघर्ष आपल्या रक्तात'; उदयनराजेंनी केलं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 02:49 PM2020-03-24T14:49:19+5:302020-03-24T14:51:34+5:30
आपण सर्वांनी भारत सरकार ने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर स्वयंशिस्तीत पालन केल्यास या रोगाला मात देऊ शकतो.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, महाराष्ट्राला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 101 वर पोहचली आहे. तसेच कोरोनामुळं ६५ वर्षीय रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. या मृत्युमुळे राज्यातील कोरोना बळींचा आकडा आता चारवर गेला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता भाजपाचे नेते छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देखील लोकांनी घाबरुन जाऊ नका असं आवाहन केले आहे.
उदयनराजे ट्विट करत म्हणाले की, सातारा, सांगली येथे कोरोना रुग्ण सापडले असले तरी लोकांनी घाबरून, गडबडून जाऊ नये. लक्षात ठेवा संघर्ष आपल्या सर्वांच्या रक्तात आहे असं उदयानराजेंनी सांगितले. तसेच आपले प्रशासन या रोगाचा निपटारा करण्यासाठी मोठ्या हिमतीने प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे त्यांना आपल्या सर्वांच्या सहकार्याची नितांत गरज आहे असं आवाहन उदयनराजेंनी केले आहे.
आपण सर्वांनी भारत सरकार ने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर स्वयंशिस्तीत पालन केल्यास या रोगाला मात देऊ शकतो. काहीही झाले तरी आपण आपल्या घराच्या बाहेर पडू नका असं उदयनराजे यांनी सांगितले. तसेच घरातील सदस्याला ताप, डोके दुखी, सर्दी, खोकला, घसा दुखणे इत्यादी त्रास होत असेल तर आपल्या नजीकच्या डॉक्टर शी संपर्क साधा अशी विनंती देखील उदयनराजे भोसले यांनी ट्विटद्वारे केले आहे.
आपण सर्वांनी भारत सरकार ने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर स्वयंशिस्तीत पालन केल्यास या रोगाला मात देऊ शकतो. काहीही झाले तरी आपण आपल्या घराच्या बाहेर पडू नका. घरातील सदस्याला ताप, डोके दुखी, सर्दी, खोकला, घसा दुखणे इत्यादी त्रास होत असेल तर आपल्या नजीकच्या डॉक्टर शी संपर्क साधा.
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) March 23, 2020
राज्यातील कोरोनाग्रस्तांची 101वर पोहचली आहे. आज पुण्यात तीन आणि साताऱ्यात 1 रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रातील रुग्णसंख्या 97 वरुन 101 वर पोहचली आहे. तसेच कोरोनामुळं ६५ वर्षीय रुग्णाचा आज मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. या मृत्युमुळे राज्यातील कोरोना बळींचा आकडा आता चारवर गेला आहे.