Coronavirus:…अन् ‘त्या’ अहवालानं पायाखालची जमीन सरकली; हतबल बापाची फेसबुक पोस्ट व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 02:36 PM2020-05-25T14:36:06+5:302020-05-25T14:38:06+5:30
बाप म्हणून जेव्हा आपल्या मुलाला कोरोना झाला आहे ही बाब समजताच त्याच्या पायाखालची जमीन सरकल्याची स्थिती निर्माण झाली.
अकोला – सध्या जगभरात ५३ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाच्या जाळ्यात ओढलं आहे. तर ३ लाख ४० हजाराहून जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशा या बिकट परिस्थिती कोरोनाच्या दहशतीखाली लोक रोजचं जीवन जगत आहेत. काही ठिकाणी लोक स्वत:च्या घरातले मृतदेह घेऊन जाण्यासही तयार नाहीत. कोरोनामुळे माणसापासून माणूस दूर जात असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
कोरोनाच्या संघर्ष काळात अकोला जिल्हा रुग्णालयातील एका आरोग्य कर्मचाऱ्याची पोस्ट व्हायरल होत आहे. ही पोस्ट वाचून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. बाप म्हणून जेव्हा आपल्या मुलाला कोरोना झाला आहे ही बाब समजताच त्याच्या पायाखालची जमीन सरकल्याची स्थिती निर्माण झाली. या बापाने फेसबुकवर हा अनुभव कथन केला आहे. त्यातून हे वाचताना अनेकांच्या डोळ्यात पाणी येईल.
या फेसबुक पोस्टमध्ये वडील लिहितात की, चार दिवसांपूर्वी मुलाला ताप आल्याने बालरोग तज्ज्ञाकडे घेऊन गेलो होतो, त्याच्यासोबत दोन लहान मित्रही होते. हॉस्पिटलमध्ये मुलाला स्वॅप देऊन घरी परतले. मुलाचा ताप कमी झाला तो पुन्हा खेळायला लागला. त्याचे मित्र देखील सोबत खेळायला लागली. दोन दिवसानंतर मी ऑफिसमध्ये कॉम्प्युटरवर कोरोनाचे रिपोर्ट पाहत होतो. त्यावेळी अचानक माझ्या मुलाचा आणि त्याचा दोन्ही मित्रांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं दिसून आले. हा रिपोर्ट पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली, कसंतरी स्वतःला सांभाळत जराही चेहऱ्यावर रडू न येता घरी आलो, घरी आल्या आल्या दोन्ही लहान पोरं विचारत होते रिपोर्टमध्ये काय आहे?
शेवटी जड अंतकरणाने मी सांगितलं, आपल्याला मुलाला कोरोना झाला आहे. हे ऐकून पत्नी आणि मुलगी दोघंही जोरजोरात रडू लागले. आपले अश्रू लपवताना त्यांचे अश्रू थांबवणे कठीण जात होते, बाबा आता काय होणार असा प्रश्न दोघेही लहान मुलं वारंवार विचारत होते. त्यावर आता आपल्या मुलगा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात राहणार असं मी सांगितले, मग मुलीने प्रश्न केला बाबा मीही त्याच्यासोबत राहते चालेल का तो एवढा लहान आहे एकटा कसा राहील? मी मात्र निरुत्तर आणि स्तब्ध होतो एकाला वाचवायला दुसऱ्याला अर्पण करायला निघालो होतो परिस्थितीच तशी भीषण होती त्याला पर्याय काहीच नव्हता अशा भीषण परिस्थितीत मुलीने मोठ्या मनाने दोघांची बॅग भरली. माझं मन आणि शरीर दोन्ही गळून गेलेलं होतं पण माझी मुलगी मात्र स्थिर झाली आणि ती तिच्या लहान भावाला समजावत होती की, आता आपल्याला एकटाच राहायचं.
पाहता-पाहता संध्याकाळचे सहा वाजले तोपर्यंत संपूर्ण परिसराला समजून गेलो होतो की, आमच्या घरी पॉझिटिव्ह आले आहेत. काही वेळानंतर १०८ रुग्णवाहिका घराजवळ आली त्यात मुलगा आणि त्याचे दोन मित्र त्यांच्या आई-वडिलांसह माझी मुलगी आणि मुलगा हे बसले आणि रुग्णवाहिका हॉस्पिटलच्या दिशेने रवाना झाली. जन्मल्यापासून ते आतापर्यंत ज्या माय बापाचं बोट कधी सोडलं नाही, त्यांना अलग होऊन कधी झोपलो नाही अशा आई-बाबांना आता सोडून राहायचं म्हणजेच खूप मोठी परीक्षा होती पण माझ्या मुलीने खूप सुंदर प्रकारे परिस्थिती हाताळली. आज दोघं चिमुकले एकटे राहतात. अशा या भीषण परिस्थिती मधून बाहेर येण्याची शक्ती ईश्वर त्यांना देवो हीच प्रार्थना आहे अशा शब्दात वडिलांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
कोरोनापाठोपाठ पाकिस्तानातून भारतात आलं मोठं संकट; संपूर्ण उत्तर प्रदेशात अलर्ट जारी
केंद्रीय रेल्वेमंत्री आणि राज्य सरकार वाद शिगेला; रात्री २ वाजता ट्विट करत पियूष गोयल म्हणाले...
उत्तर प्रदेश सरकारचा मोठा निर्णय; स्थलांतरित कामगारांना परत बोलवायचं असेल तर...
कोरोनावरील लस सर्वप्रथम कोणाला मिळणार?; केंद्र सरकारने आखला ‘असा’ प्लॅन!
जाणून घ्या, ४८ तासांनंतर बदलणार अमेरिकेचा इतिहास; नासा पुन्हा सुरु करणार ‘मानव मिशन’!