CoronaViurs: चिंताजनक! कोरोना रुग्णांसाठी रुग्णालयांत बेड्सचा तुटवडा; डॉक्टरांची संख्याही कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 11:02 AM2020-05-07T11:02:03+5:302020-05-07T11:02:58+5:30
दुसरीकडे मास्कचा देखील तुटवडा निर्माण झाला आहे. मेडिकलमध्ये देखील मास्क उपलब्ध नसल्याने ऑनलाईन खरेदी करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक १६ हजारांपेक्षा जास्त रुग्ण असून, एकट्या मुंबईत त्यातील १० हजारांपेक्षाही जास्त रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात कोरोनाचे 1233 नवीन रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात सध्या कोरोनाचे 16,758 रुग्ण आहेत. राज्यात कोरोनामुळे 651 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा 10,714 पर्यंत पोहोचला आहे. एकट्या मुंबईत कोरोनाच्या मृतांची संख्या 412 आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत 25 कोरोना पॉझिटिव्ह लोकांचा मृत्यू झाला आहे. आज धारावीमध्ये 68 नव्या रुग्णांची नोंद झाली असून परिसरातील कोरोनाबाधितांचा आकडा 733 पर्यंत पोहोचला आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे 3094 रुग्ण बरे झाले असून त्यांना आता डिस्जार्ज देखील देण्यात आला आहे. तर जेजे पोलीस स्टेशनच्या आणखी 16 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता जेजे पोलीस स्टेशनमधील एकूण 28 कर्मचारी व अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.
मुंबईतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असल्यामुळे रुग्णांसाठी असलेले बेड कमी पडत आहेत. तर दुसरीकडे उपचारांसाठी डॉक्टरांची संख्यादेखील कमी आहे. वाढत्या कोरोना संक्रमित रुग्णांमुळे मुंबईत जवळपास 15 हजार डॉक्टरांची गरज आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांना सेवा देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मान्यताप्राप्त आणि पदवीधारक डॉक्टरांनी कोविड रुग्णालयांमध्ये सेवा देण्याबाबत आदेश काढण्यात आले आहेत. या आवाहनाला प्रतिसाद न दिल्यास खासगी डॉक्टरांवर कारवाई केली जाऊ शकते.
तर दुसरीकडे मास्कचा देखील तुटवडा निर्माण झाला आहे. मेडिकलमध्येदेखील मास्क उपलब्ध नसल्याने ऑनलाईन खरेदी करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. ऑनलाईन मास्क खरेदी करण्यासाठी 200 ते 300 रुपये मोजावे लागत आहेत. जे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.