‘त्या’ नगरसेवकाला वडिलांना भेटण्याची मुभा
By admin | Published: January 19, 2016 04:05 AM2016-01-19T04:05:03+5:302016-01-19T04:05:03+5:30
बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात असलेल्या चौघा नगरसेवकांपैकी काँग्रेसच्या विक्रांत चव्हाण यांना त्यांच्या
ठाणे : बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात असलेल्या चौघा नगरसेवकांपैकी काँग्रेसच्या विक्रांत चव्हाण यांना त्यांच्या आजारी वडिलांना भेटण्यासाठी न्यायालयाने अर्ध्या तासाची मुभा दिली. या परवानगीनंतर एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या भीमसेन चव्हाण यांची आणि मुलगा विक्रांत यांची रविवारी काही काळासाठी का होईना भेट घडून आली.
आपले वडील अर्धांगवायूने ग्रस्त असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे त्यांना भेटण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी त्यांनी ठाणे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.व्ही. बांबर्डे यांच्याकडे १५ जानेवारी रोजी केली होती. त्यांच्या या अर्जावर न्यायालयाने तपास अधिकारी दिलीप गोरे यांचे म्हणणे मागविले. त्यावर, भीमसेन यांच्यावर उपचार करणाऱ्या खासगी डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीची पोलिसांनी माहिती घेतली. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याच अभिप्रायाच्या आधारावर पोलिसांनी पितापुत्र भेटीला आक्षेप घेतला. तेव्हा न्यायालयाने माणुसकीच्या दृष्टिकोनातून भीमसेन हे आजारी असल्यामुळे त्यांच्याही भावनांचा विचार करून या भेटीला अर्ध्या तासाची परवानगी दिली.
न्यायालय आणि जिल्हा कारागृहाकडून परवानगीबाबतची सर्व कार्यवाही झाल्यानंतर रविवारी सकाळी १०.३० ते ११ या वेळेत विक्रांत हे आपल्या वडिलांना भेटले. वडिलांच्या प्रकृतीची विचारपूस आणि डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर त्यांची पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.
(प्रतिनिधी)