Coronavirus: कॉर्पोरेट कार्यालयं १०० टक्के बंद होणार?; राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 02:05 PM2020-03-17T14:05:34+5:302020-03-17T14:07:11+5:30
Coronavirus लोकल, मेट्रोमधील गर्दी टाळण्यासाठी सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता
मुंबई: राज्यात कोरोनामुळे पहिला मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारनं महत्त्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केलीय. लोकल आणि मेट्रोमधील गर्दी टाळण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याची हमी त्यांनी दिली. लोकल, मेट्रो सेवा बंद करण्याचा विषय थेट आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारित येत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत याबद्दलचा निर्णय होईल, असं त्यांनी सांगितलं. मुंबईत एका ६३ वर्षीय व्यक्तीचा कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. यानंतर टोपे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकार घेत असलेल्या निर्णयांची माहिती दिली.
Rajesh Tope, Minister of Public Health and Family Welfare Maharashtra: People from the corporate sector had come to this important meeting and they have ensured all cooperation. They are ready for our decision of 'Work from home'. #CoronavirusOutbreakpic.twitter.com/m6kmEak6Sp
— ANI (@ANI) March 17, 2020
देशभरातल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या १३४ इतकी आहे. यातले सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे राज्यातील परिस्थिती संवेदनशील असल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं. खासगी कंपन्यांनी शक्य तितक्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची परवानगी द्यावी. यासंदर्भात २० ते २५ कंपन्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली. लोकल, मेट्रोतील गर्दी टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे संकेत टोपेंनी दिले.
Rajesh Tope, Minister of Public Health and Family Welfare Maharashtra: Right now we are in phase 2, strong steps are being taken to ensure that this doesn't advance into phase 3. #CoronavirusOutbreakhttps://t.co/KEbcWEQKyq
— ANI (@ANI) March 17, 2020
खासगी कार्यालयं बंद करण्यासंदर्भात कंपन्यांसोबत सकारात्मक चर्चा असून या कंपन्या सहकार्य करण्यास तयार आहेत. कॉर्पोरेट आणि मनोरंजन क्षेत्रातल्या कंपन्यांसोबत चर्चा झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कॉर्पोरेट सेक्टर बंद करण्याबद्दल चर्चा झाली आहे. याशिवाय खासगी रुग्णालयांना कोरोनावर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बहुतांश जण फेस मास्क आणि सॅनिटायझर खरेदी करत आहेत. याचा गैरफायदा घेऊन बोगस, दुय्यम दर्जाची उत्पादनं बाजारात आणली जात आहेत. अशांवर एफडीएच्या माध्यमातून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.