एसटी कर्मचा-यांविरुद्ध महामंडळ आक्रमक, कारवाईचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 03:22 AM2018-01-25T03:22:12+5:302018-01-25T03:22:55+5:30

एसटी कर्मचा-यांच्या वेतनवाढीसाठी नेमलेल्या उच्चाधिकार समितीच्या अहवालाचा निषेध करण्यासाठी गुरुवारी राज्यभर अहवालाची होळी करण्यात येणार आहे.

 The corporation's aggressive, action-oriented directives against ST employees | एसटी कर्मचा-यांविरुद्ध महामंडळ आक्रमक, कारवाईचे निर्देश

एसटी कर्मचा-यांविरुद्ध महामंडळ आक्रमक, कारवाईचे निर्देश

Next

मुंबई : एसटी कर्मचा-यांच्या वेतनवाढीसाठी नेमलेल्या उच्चाधिकार समितीच्या अहवालाचा निषेध करण्यासाठी गुरुवारी राज्यभर अहवालाची होळी करण्यात येणार आहे. महामंडळाने आक्रमक भूमिका घेत राज्यभरात सूचनांचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. यात कृती संघटनांनी होळी केल्यास व्हिडीओ चित्रीकरण करण्याच्या सूचना केल्या आहेत. तर शांतता भंग पावेल, अशी कृती करणा-यांवर कारवाई करण्याची मुभा महामंडळाने संबंधित विभागांना दिली.
दिवाळीत एसटी कर्मचा-यांनी वेतनासाठी संप पुकारला होता. परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांना संप हाताळण्यास अपयश आल्याने न्यायालयाने हस्तक्षेप केला. न्यायालयाने वेतनवाढीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना केली. मात्र, समितीने न्यायालयात सादर केलेला अहवाल निराशाजनक आहे. परिणामी, अहवालाचा निषेध करण्यासाठी राज्यभर अहवालाची होळी करण्याचा निर्णय आयोग कृती समितीने घेतला होता. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने सर्व विभाग नियंत्रकासह कार्यशाळा आणि प्रशिक्षण संस्था यांच्यासाठी विशेष परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
कारवाईचे निर्देश-
अहवालाची होळी करणे हे आक्षेपार्ह आणि कारवाईस पात्र असेल, अशा प्रसंगाचे संबंधित विभागाने व्हिडीओ चित्रीकरण करावे. यात सहभागी कर्मचा-यांचा अहवाल करावा, अशा सूचना केल्या आहेत. तर याचा परिणाम प्रवासी वाहतुकीवर होणार नाही याची दक्षता राखणे, महामंडळाच्या आवारात पोस्टर, बॅनर्स आणि कटआउट लावण्यात येऊ नये, सबळ कारणाशिवाय कर्मचा-यांना रजा देऊ नये, शांतता भंग पावेल, अशी कृती करणा-या कर्मचा-यांवर त्वरित कारवाई करावी, असेही महामंडळाने स्पष्ट केले आहे.

Web Title:  The corporation's aggressive, action-oriented directives against ST employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.