समाज घटकांसाठी महामंडळे; मंत्रिमंडळ बैठकीत जैन, बारी, तेली समाजासाठी महत्त्वाचे निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 07:07 AM2024-10-05T07:07:12+5:302024-10-05T07:07:26+5:30
विविध समाजातील घटकांची सामाजिक व आर्थिक उन्नती व्हावी, तसेच युवकांना देखील शिक्षणासाठी फायदा व्हावा यासाठी ही महामंडळे काम करतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील जैन, बारी, तेली, हिंदू-खाटीक, लोणारी या समाजासाठी तसेच जैन समाजासाठी आर्थिक विकास महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय शुक्रवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
विविध समाजातील घटकांची सामाजिक व आर्थिक उन्नती व्हावी, तसेच युवकांना देखील शिक्षणासाठी फायदा व्हावा यासाठी ही महामंडळे काम करतील. जैन समाज महामंडळाच्या कामासाठी १५ पदे मंजूर करण्यात आली. याशिवाय बारी समाजासाठी संत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
लोकसंख्येची अट शिथिल होणार
बंजारा, लमाण, लभाण तांड्यात ग्रामपंचायत स्थापण्यासाठी लोकसंख्येची अट शिथिल करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. सध्या ही लोकसंख्येची अट एक हजार इतकी असून, या निर्णयामुळे आता ७०० अशी होणार आहे. राज्यात २० ते २५ लाख बंजारा समाज ४ हजारांहून अधिक तांड्यात राहतात.
बौद्ध समाजातील संस्थांना दहा लाखांपर्यंत अनुदान
राज्यातील बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना दहा लाखांपर्यंत अनुदान देणाऱ्या योजनेस मान्यता देण्यात आली. या संस्थांना दहा लाखांपर्यंत अनुदान देण्यात येईल. यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ५१ टक्क्यांपेक्षा जास्त बौद्ध विश्वस्त व सदस्य असलेल्या संस्थांना पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
रमाई आवास, शबरी आवास योजनेतील अनुदानात वाढ
रमाई आवास, शबरी आवास योजनेतील घरकूल अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बांधकाम
साहित्याचे दर वाढल्याने हे अनुदान वाढवण्यात आले आहे.