सर्व समाजांची महामंडळे एकाच आयटी प्लॅटफॉर्मवर; प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पांनाही युनिक आयडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 14:08 IST2025-01-03T14:06:19+5:302025-01-03T14:08:17+5:30
अनेक विभाग एकाच ठिकाणी एकाच प्रकारची विकासकामे करतात. त्यातून तीच ती कामे होऊन कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. ते टाळून विकासकामांचे सुयोग्य नियोजन व्हावे आणि त्यात सुसूत्रता असावी, यासाठी प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पाला युनिक आयडी असावा, अशी सूचना फडणवीस यांनी केली.

सर्व समाजांची महामंडळे एकाच आयटी प्लॅटफॉर्मवर; प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पांनाही युनिक आयडी
मुंबई : आधार हा जसा एका व्यक्तीचा युनिक आयडी असतो, तसाच युनिक आयडी प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी तयार करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. विविध सामाजिक महामंडळे एकाच आयटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचा निर्णयही घेण्यात आला.
अनेक विभाग एकाच ठिकाणी एकाच प्रकारची विकासकामे करतात. त्यातून तीच ती कामे होऊन कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. ते टाळून विकासकामांचे सुयोग्य नियोजन व्हावे आणि त्यात सुसूत्रता असावी, यासाठी प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पाला युनिक आयडी असावा, अशी सूचना फडणवीस यांनी केली.
त्यामुळे कोणत्या भागात, कोणत्या कामाचे नियोजन केले आहे आणि नेमके कोठे, कोणत्या प्रकल्पाची गरज आहे, हे एकत्रितपणे एका डॅशबोर्डवर उपलब्ध असेल.
ही माहिती पीएम गतिशक्ती पोर्टल, ग्रामविकास पोर्टल, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर (एमआरसॅक), इत्यादींशी एकीकृत असेल. याचे प्रारूप निश्चित करण्यासाठी ज्येष्ठ अधिकाऱ्यांची समिती सरकारला अहवाल देईल.
अधिकाऱ्यांची समिती स्थापन
सर्व समाजविकास महामंडळे एकाच आयटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचा निर्णयसुद्धा फडणवीस यांनी घेतला. त्यामुळे सर्व विकास महामंडळांच्या सर्व योजना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. त्यातून ‘इज ऑफ लिव्हिंग’चा उद्देश साध्य होणार आहे. याचे प्रारूप निश्चित करण्यासाठीसुद्धा चार अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात आली आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बैठकीत शोकप्रस्ताव मांडण्यात आला. डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान, अर्थमंत्री आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर या भूमिकांमधून देशसेवा केली. त्यांचे अर्थशास्त्रविषयक योगदान आणि लेखन नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, अशा भावना मंत्रिमंडळाने व्यक्त केल्या.