पाणीकपातीवरून नगरसेवक आक्रमक
By admin | Published: August 24, 2016 02:10 AM2016-08-24T02:10:36+5:302016-08-24T02:10:36+5:30
पावसाळा सुरू झाल्यापासून प्रशासनाने केलेल्या पाणीकपातीचे पडसाद सर्वसाधारण सभेमध्ये उमटले.
नवी मुंबई : पावसाळा सुरू झाल्यापासून प्रशासनाने केलेल्या पाणीकपातीचे पडसाद सर्वसाधारण सभेमध्ये उमटले. १२ लाख शहरवासीयांना वेठीस धरल्याबद्दल सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाचा धिक्कार केला. नागरिकांना पुरेसे पाणी मिळाले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा दिला आहे.
राज्यात सर्वत्र दुष्काळ असतानाही उन्हाळ्यामध्ये नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यात आले होते. परंतु पाऊस सुरू झाल्यापासून प्रशासनाने पाणीकपात सुरू केली आहे. पिण्यासाठीही पुरेसे पाणी मिळत नाही. पाणीप्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक सूरज पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. महापालिकेने २४ तास पाणीपुरवठा करण्याचे धोरण आखले आहे. परंतु प्रशासनाने प्रतिव्यक्ती १३५ लिटर पाणी पुरविण्याचा निर्णय परस्पर घेतला आहे.
सभागृहाला विश्वासात न घेता हा निर्णय घेतलाच कसा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. प्रशासन नागरिकांना वेठीस धरत आहे. सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असताना नवी मुंबईमध्ये मात्र पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. प्रशासनाने मनमानी थांबविली नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. नगरसेविकांनी आक्रमकपणे पाण्याची समस्या मांडली. पहाटेपासून नागरिक पाणी आले नाही म्हणून फोन करतात. घरामध्ये स्वयंपाक व पिण्यासाठीही पाणी दिले जात नाही. स्वत:च्या मालकीचे धरण असणाऱ्या महापालिकेला पावसाळ्यात पाणी देता येत नाही ही शोकांतिका आहे. नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. अधिकारी चुका करत असून त्याचा त्रास लोकप्रतिनिधींना सहन करावा लागत असल्याची खंतही व्यक्त केली.
तुर्भेमधील राष्ट्रवादीच्या नगरसेविका शुभांगी पाटील यांनी २४ तास पाणी पुरविले जात असल्याच्या दाव्यावर टीका केली. आमच्या प्रभागात येवून पहा पिण्यासाठीही पाणी मिळत नाही. नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. आतापर्यंत आम्ही नागरिकांना समजावत होतो. परंतु आता रस्त्यावर उतरून निषेध करण्याचा इशारा त्यांनी दिला. काँगे्रसच्या हेमांगी सोनावणे यांनीही आम्ही २४ तास पाणी मागत नाही. गरजेपुरते पाणी द्या. धरणात पाणी साठा असताना नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवण्याच्या धोरणाचा त्यांनी निषेध केला. आम्हाला कारणे सांगू नका पाणी द्या असे समजावले. शिवसेनेचे संजू वाडे यांनी जनतेच्या असंतोषाचा उद्रेक होईल असे स्पष्ट केले. मंदाकिनी म्हात्रे, फशीबाई भगत, दिव्या गायकवाड, मनीषा भोईर, सरोज पाटील, संगीता पाटील, उषा भोईर, शशिकला सुतार, ममीत चौगुले, वैजयंती भगत, अंजली वाळुंज, भारती पाटील, संगीता बोऱ्हाडे, सुरेखा नरबागे, गिरीष म्हात्रे, मीरा पाटील, रामदास पवळे, दीपक पवार, रूपाली भगत, सुनील पाटील, एम. के. मढवी, नंदा काटे,सुजाता पाटील, ज्ञानेश्वर सुतार यांनी प्रशासनास धारेवर धरले. (प्रतिनिधी)
>कुटुंब विभक्त करायचे का?
कुकशेतमधील राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेविका सुजाता पाटील यांना महापौर सुधाकर सोनावणे यांनी बोलण्याची परवानगी दिली नाही. तुमच्या पतीनेच लक्षवेधी मांडली असल्याचे सांगितले. यावर सुजाता पाटील यांनी नवरा बोलला म्हणून मी बोलायचे नाही असा नियम आहे का. प्रभागातील जनतेला पिण्यासाठी पाणी मिळत नसताना मी गप्प बसणार नाही. प्रत्येक घरात ५ सदस्य गृहीत धरून प्रत्येकी १३५ लिटरप्रमाणे पाणी दिले जात आहे. ज्या कुटुंबात पाचपेक्षा जास्त माणसे असतील तर काय करायचे. पाण्यासाठी आम्ही कुटुंब विभक्त करायचे का, आई- वडील, सासू-सासरे यांना सांभाळायचे नाही का असा प्रश्न उपस्थित करताच सर्व निरूत्तर झाले.
>मनमानी सहन केली जाणार नाही
शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी आयुक्त व प्रशासनाला धारेवर धरले. पाण्यासाठी जनतेचा छळ सुरू असून आम्ही तो सहन करणार नाही. आम्ही याचक नाही. आमचा हक्क आहे. प्रत्येक सोसायटीमध्ये पाणी मिळाले नाही तर जनआंदोलन उभे करावे लागेल असा इशारा त्यांनी दिला.
>व्यावसायिकांना मीटर नाही
महापालिकेने शहरातील व्यावसायिक ग्राहकांना अद्याप मीटरच बसविलेले नाहीत. यामुळे एखाद्या विभागात निवासी वापरासाठी किती व वाणिज्य वापरासाठी किती पाण्याचा वापर केला याची सविस्तर माहिती उपलब्ध होत नसल्याचा गौप्यस्फोट आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला आहे. यामुळे व्यावसायिकांकडून पाण्याचा प्रचंड दुरूपयोग होत असल्याची शंका आहे. आयुक्त दिशाभूल करणारी माहिती देत असल्याचे मत महापौर सुधाकर सोनावणे यांनी व्यक्त केले आहे.