नगरसेवक विशाल कोतकरला कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 01:03 AM2018-04-25T01:03:55+5:302018-04-25T01:03:55+5:30
केडगाव येथे ७ एप्रिल रोजी सेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची संदीप गुंजाळ याने हत्या केली़ या घटनेनंतर गुंजाळ पोलिसांत हजर झाला़
अहमदनगर : काँग्रेसचा कार्यकर्ता रवी खोल्लम याच्या कुटुंबाला संरक्षण देण्यासाठी पाठविलेल्या संदीप गुंजाळ यानेच परस्पर दोघा शिवसैनिकांची हत्या केली़ या घटनेशी कोणत्याही राजकीय नेत्यांचा संबंध नाही, अशी माहिती केडगाव दुहेरी हत्याकांडाचा केंद्रबिंदू ठरलेला नवनिर्वाचित काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकर याने पोलिसांना दिली़ कोतकर याला विशेष पथकाने मंगळवारी पहाटे नगर शहराजवळ अटक केली़ न्यायालयाने त्याला २७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
केडगाव येथे ७ एप्रिल रोजी सेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची संदीप गुंजाळ याने हत्या केली़ या घटनेनंतर गुंजाळ पोलिसांत हजर झाला़ मात्र, ज्याच्या सांगण्यावरून हत्या झाली तो विशाल कोतकर फरार होता़ या हत्याकांडाचा सूत्रधार म्हणून विशाल याचे नाव पोलिसांच्या तपासात समोर आले होते. गुन्हे शाखेची टीम गेल्या १७ दिवसांपासून त्याचा शोध घेत होती़ शिवसैनिक कोतकर व ठुबे यांना मारण्याचे मी अथवा इतर कुणी गुंजाळ याला सांगितले नव्हते,अशी माहिती विशाल कोतकर याने पोलिसांना दिली आहे़ कोतकर याने दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. कोतकर याला न्यायालयात हजर केले असता त्याला २७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
भाजप आमदार कर्डिले यांना जामीन मंजूर
केडगाव हत्याकांडानंतर पोलिसांनी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना अटक केली होती. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला केला. या प्रकरणी आ. जगताप यांचे सासरे व भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह तीनशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. कर्डिले सध्या न्यायालयीन कोठडीत होते. त्यांना मंगळवारी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. साक्षीदारावर दबाव आणायचा नाही, दर रविवारी पोलीस ठाण्यात हजेरी देण्याच्या अटींवर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.