खडसे परिवाराची बदनामी करण्याची धमकी देऊन खंडणी मागणा-या नगरसेवकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2018 11:17 AM2018-03-11T11:17:05+5:302018-03-11T16:41:38+5:30
50 हजाराची खंडणी मागण्यासह खडसे परिवाराची बदनामी करण्याची धमकी देणा-या नगरसेवकाला अटक
यावल (जळगाव) - जिल्हाधिका-यांकडे आपल्या विरुद्ध दाखल केलेली आपात्रतेची तक्रार मागे घ्या अन्यथा तुमच्यासह माजी मंत्री एकनाथराव खडसे व खडसे परिवाराची क्लीपद्वारे बदनामी करेल, अशी धमकी यावलचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांना देत ५० हजार रुपयांची खंडणी मागणारे नगरसेवक सुधाकर धनगर यांच्या विरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आले आहे.
या बाबत मिळालेली माहिती अशी की, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे यावलचे नगरसेवक अतुल पाटील यांनी यावलचेच नगरसेवक सुधाकर धनगर यांना अपात्र ठरविण्याबाबत जळगावच्या जिल्हाधिका-यांकडे तक्रार केल्याच्या संशयावरुन धनगर यांनी अतुल पाटील यांना तक्रार मागे घेण्यासाठी मोबाईलवर संपर्क साधून अश्लील भाषा वापरली. तसेच माजी मंत्री एकनाथराव खडसे व त्यांच्या परीवाराविरुध्ददेखील अश्लील भाषा वापरून क्लीपव्दारे बदनामी करण्याची धमकी दिली. या सोबतच ही बदनामी टाळण्यासाठी ५० हजाराची मागणी केल्याचा आरोप अतुल पाटील यांनी केला आहे.
मागितलेल्या ५० हजारापैकी पाटील यांनी १० हजार रुपये रोख दिल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे. उर्वरित रक्कम 8-10 दिवसात देण्याची मागणी करीत तसे न झाल्यास तुझे हातपाय तोडू अशी धमकी धनगर यांनी दिली, अशी तक्रार अतुल पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात दिल्यावरून धनगर यांच्या विरुद्ध भाग ५ गु. र. नं. २८ / १८, भा.दं.वि. कलम ३८७ /२९४नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यावल पोलीस ठाण्याचे फौजदार अशोक अहिरे व सहका-यांनी औरंगाबाद येथून सुधाकर धनगर यांना अटक केली.