प्रभाग फेररचनेच्या प्रतीक्षेत नगरसेवक
By admin | Published: August 25, 2016 06:03 AM2016-08-25T06:03:19+5:302016-08-25T06:03:19+5:30
महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर होऊन प्रभागांच्या फेररचनेची प्रक्रिया नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे स्पष्ट करण्यात आले
मुंबई: महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर होऊन प्रभागांच्या फेररचनेची प्रक्रिया नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे़ मात्र, आरक्षणातून आपला वॉर्ड सुटला, तरी फेररचनेत काय होईल, या भीतीने नगरसेवक सध्या धास्तावले आहेत़ त्यातच प्रभागांची फेररचना नोव्हेंबरपर्यंत स्पष्ट होणार आहे़ या बदलेल्या मतदारसंघात प्रचार करण्यासाठी केवळ दोन ते तीन महिन्यांचा वेळ मिळत असल्याने नगरसेवकांचे टेंशन वाढले आहे़
महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार आहे़ यामुळे इच्छुक नगरसेवक व पक्षातील कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे़ मात्र, प्रचाराला सुरुवात करण्याआधी आरक्षणाची सोडत आणि त्यात आता प्रभागांच्या फेररचनेकडे नगरसेवक डोळे लावून बसले आहेत़ सोडतीमध्ये आपल्या वॉर्ड महिला अथवा मागासवर्गीय उमेदवारासाठी आरक्षित झाल्यास, जवळच्या वॉर्डांमध्ये चाचपणी करण्यास नगरसेवकांनी या पूर्वीच सुरुवात केली आहे़ सणासुदीचा काळ हा मतदारसंघामध्ये प्रचारसाठी, घरोघरी पोहोचण्याकरिता बेस्ट असल्याने, फेरचनेची प्रक्रिया त्या पूर्वी पूर्ण व्हावी, अशी नगरसेवकांना आशा होती़ मात्र, प्रभाग फेररचनेचे निकाल नोव्हेंबरमध्ये जाहीर होत असल्याने नगरसेवकांची सर्व गणिते बिघडली आहेत़ त्यातही आशावादी असलेल्या नगरसेवकांनी आपल्या व बाजूच्या वॉर्डात नागरिकांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली आहे़ (प्रतिनिधी)
>सणातील प्रचारावर पाणी
५ आॅक्टोबर रोजी प्रभाग फेररचनेचा मसुदा जाहीर होणार आहे़ त्यामुळे नगरसेवकांना आपल्या वॉर्डाचा अंदाज येईल़ मात्र, दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र असे सण त्या पूर्वीच येत असल्याने ५० हजार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नगरसेवकांनी सुवर्णसंधी हुकणार आहे़
>असा आहे फेररचनेचा कार्यक्रम
प्रभाग फेररचनेचा ५ आॅक्टोबरपर्यंत मसुदा तयार होईल़ हा मसुदा प्रकाशित केल्यानंतर, २० आॅक्टोबर रोजी सूचना व हरकती मागविण्यात येतील़ १८ नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोग प्रभाग फेररचनेवर अंतिम निर्णय घेईल़ त्यानंतर, २२ नोव्हेंबरला आयुक्त प्रभाग फेररचनेची अंतिम यादी जाहीर करतील़