नगरसेवकांची होणार पुन्हा ‘दिवाळी’

By admin | Published: November 4, 2016 01:16 AM2016-11-04T01:16:41+5:302016-11-04T01:16:41+5:30

विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या एका जागेसाठी बहुरंगी लढत होणार आहे.

Corporators will be again 'Diwali' | नगरसेवकांची होणार पुन्हा ‘दिवाळी’

नगरसेवकांची होणार पुन्हा ‘दिवाळी’

Next


बारामती : दिवाळीचा सण उत्साहात साजरा झाला. त्यानंतर विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या एका जागेसाठी बहुरंगी लढत होणार आहे. त्यामुळे नगरसेवकांची पुन्हा ‘दिवाळी’ होणार, अशी चर्चा आता रंगली आहे.
सध्या नगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. येत्या ११ तारखेपासून प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी १९ नोव्हेंबरला मतदान होत आहे. त्यामुळे प्रमुख पक्षांकडून विद्यमान नगरसेवकांना डावलले गेल्यास पक्षाच्या उमेदवाराला डावलून मतदान होण्याची शक्यता आहे.
बहुरंगी लढत असल्यामुळे घोडेबाजाराला ऊत येण्याची शक्यता आहे. नगरसेवकांसाठी तर दिवाळीनंतरची निवडणूक दिवाळी पर्वणी ठरणार आहे. यापूर्वी झालेल्या दोन निवडणुका तशा एकतर्फीच झाल्या. त्यामुळे फारसा ‘आर्थिक पाझर’ या निवडणुकीसाठी पात्र असलेल्यांपर्यंत आला नाही, त्याच अनुषंगाने एकापेक्षा अधिक उमेदवार असल्यावर चंगळच होणार, अशी चर्चा रंगत आहे.
नगरपालिका निवडणूक तोंडावर असताना सध्याच्या विद्यमान नगरसेवकांना मात्र चांगलाच भाव आला आहे. पुणे विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या अनिल भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास लांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे संजय जगताप, भाजपाचे अशोक येनपुरे, शिवसेनेचे ज्ञानेश्वर खंडागळे, मनसेचे राजेंद्र वागसकर या प्रमुख उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
>बहुरंगी लढतीने नगरसेवकांचे महत्त्व वाढले...
विधान परिषदेच्या पूर्वीचा समझोता बासनात गुुंडाळून राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वच जागांवर त्यांचे उमेदवार दिले. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाली. पुणे विधान परिषदेच्या एका जागेसाठीदेखील भोसले यांच्या विरोधात काँग्रेसचे जगताप यांची लढत महत्त्वपूर्ण आहे. तसेच, अन्य दिग्गज ३ उमेदवार असल्याने नगरसेवकांचे मत मिळविण्यासाठी या ५ उमेदवारांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.विशेषत: दिवाळीनंतरची दुसऱ्या दिवाळीच्या फटाक्यांची आतषबाजी करताना उमेदवारांनाही नाकीदम येणार आहे. एकेका नगरसेवकांचे मत महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या तरी पंचरंगी लढत दिसत आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या ५ नोव्हेंबरनंतर चित्र स्पष्ट होईल.
>‘रसद’च ठरणार महत्त्वाची : या जागेसाठी एकूण ६८७ मतदार पात्र आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वाधिक २९८, काँग्रेसचे १२४, शिवसेनेचे ७६, भाजपाचे ७१, मनसेच्या ३६, रिपाइंच्या ४, लोकशाही आघाडी १२, शिरूर शहर विकास आघाडी १८, अपक्ष २६ अशी मतांची गोळाबेरीज आहे. त्यामुळे निवडणूक जिंकण्याचा जादूई आकडा गाठण्यासाठी ‘रसद’च महत्त्वाची ठरणार आहे.

Web Title: Corporators will be again 'Diwali'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.