विशेष चौकशीसाठी सैन्याशी पत्रव्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2017 04:56 AM2017-05-04T04:56:10+5:302017-05-04T04:56:10+5:30
सैन्य भरती घोटाळ्यात आरोपी असलेल्या सैन्यातील कर्मचाऱ्यांची भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये चौकशी करण्यासाठी ठाणे
ठाणे : सैन्य भरती घोटाळ्यात आरोपी असलेल्या सैन्यातील कर्मचाऱ्यांची भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये चौकशी करण्यासाठी ठाणे पोलिसांनी सैन्याच्या सक्षम अधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली आहे. त्यासाठीचे पत्र बुधवारी पाठवण्यात आले.
सैन्यातील चार पदांसाठी २६ फेब्रुवारी रोजी देशभरात लेखी परीक्षा घेतली जाणार होती. तिची प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या टोळीला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने (घटक क्र. १) नागपूर, पुणे आणि गोवा येथे धाडी टाकून अटक केली होती. या प्रकरणात २४ आरोपींना पोलिसांनी अटक केली. आरोपींमध्ये सैन्य भरतीचे प्रशिक्षण देणाऱ्या काही क्लासेसच्या संचालकांसह नागपूर येथील सैन्य भरती कार्यालयातील लिपिकवर्गीय कर्मचारी रवींद्रकुमार जांगू, धरमवीरसिंग आणि निगमकुमार पांडे यांचाही समावेश आहे. पोलिसांनी तिन्ही ठिकाणी परीक्षेच्या एक दिवस आधी म्हणजे २५ फेब्रुवारी रोजी धाड टाकली, तेव्हा ३५० विद्यार्थी दुसऱ्या दिवशीच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवताना आढळले. प्रश्नपत्रिकेच्या मोबदल्यात विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी २ ते ३ लाख रुपयांचा व्यवहार होणार होता.
आरोपींनी या गोरखधंद्यातून मोठ्या प्रमाणात माया जमा केल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय, प्रश्नपत्रिका फोडण्याची आरोपींची ही पहिली वेळ नव्हती, अशी माहितीही तपासात समोर आली. त्यामुळे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये आरोपींचा तपास करणे क्रमप्राप्त ठरते. मात्र, या कायद्यान्वये लोकसेवकाची चौकशी करण्यापूर्वी सक्षम प्राधिकाऱ्याची मंजुरी अनिवार्य असते. त्यासाठी ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने सैन्याशी पत्रव्यवहार केला आहे. सैन्याच्या सदर्न कमांडचे मुख्यालय पुणे येथे असून, चौकशीसाठीच्या परवानगीचे विनंती पत्र गुरुवारी या मुख्यालयाकडे पाठवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
धाकलू पाटीलचे सर्व मार्ग बंद
आसाम रायफल रेजिमेंटचा जवान धाकलू पाटील याचा या गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाल्यानंतर त्याच्या अटकेस सैन्याने ठाणे पोलिसांना परवानगी दिली होती. परंतु, त्याचा ठावठिकाणा पोलिसांना लागलेला नाही. या आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे जिल्हा न्यायालयाने अगोदरच फेटाळला होता. उच्च न्यायालयातही त्याचा अर्ज मंजूर झाला नाही. त्यामुळे धाकलू पाटीलचे सर्व मार्ग बंद झाले असून, शरणागती पत्करण्याशिवाय त्याच्यासमोर पर्याय नसल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.