महिला अत्याचाराच्या प्रश्नावरून राज्यपाल-मुख्यमंत्री यांच्यात पत्रसंघर्ष; कोश्यारी यांच्या सूचनेला ठाकरेंचं प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 06:28 AM2021-09-22T06:28:26+5:302021-09-22T06:28:43+5:30
साकीनाका येथील बलात्काराच्या अमानुष घटनेनंतर भाजप महिला आघाडीचे एक शिष्टमंडळ राज्यपाल कोश्यारी यांना भेटले होते व राज्यातील महिलांवरील वाढत्या त्याचारासंदर्भात निवेदनही दिले होते.
मुंबई : राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार यांच्यातील संघर्षाची धार अधिक तीव्र होत असतानाच आता त्यात एका पत्रसंघर्षाची भर पडली आहे. मुंबईत साकीनाका येथे महिलेवर झालेला बलात्कार, तिचा मृत्यू आणि महिलांची सुरक्षितता यावर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे दोन दिवसांचे अधिवेशन बोलवावे अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे. त्यावर, हा विषय साकीनाक्यापुरता मर्यादित नसून राष्ट्रव्यापी आहे. देशातील महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी संसदेचे चार दिवसांचे विशेष सत्र बोलवावे, अशी मागणी आपण पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करावी, असे जोरदार प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पत्राद्वारे दिले आहे. (Correspondence between the Governor and the Chief Minister on the issue of atrocities against women; Thackeray's reply to Koshyari's suggestion)
साकीनाका येथील बलात्काराच्या अमानुष घटनेनंतर भाजप महिला आघाडीचे एक शिष्टमंडळ राज्यपाल कोश्यारी यांना भेटले होते व राज्यातील महिलांवरील वाढत्या त्याचारासंदर्भात निवेदनही दिले होते.
राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रासोबत या निवेदनाची प्रत जोडली असून त्यात राज्यातील अलिकडच्या महिला अत्याचाराच्या घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. आपल्याला भेटलेल्या शिष्टमंडळांमधील महिलांच्या मनात एकूण महिला वर्गाविषयी असुरक्षिततेची भावना दिसून आली, तसेच महिला आमदारांनीही याकडे लक्ष वेधले होते, असे नमूद करून राज्यपालांनी या पत्रात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली.
सरकार सरकारचे काम करीत आहे. त्यामुळे आता विधिमंडळाचे खास अधिवेशन बोलावून चर्चा घडविण्याची आपली सूचना नवा वाद निर्माण करू शकते, सरकारविरोधी लोकांची विशेष अधिवेशनाची मागणी सुरू असताना राज्यपालांनी त्याच सुरांत सूर मिसळून तीच मागणी करणे हे संसदीय लोकशाही पद्धतीस मारक आहे. - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांच्या पत्रातील मुद्दे...
- गुजरातमध्ये बलात्काराच्या रोज तीन घटना घडतात. यावर चर्चा करायची झाल्यास गुजरात विधानसभेचे एक महिन्याचे विशेष अधिवेशनच बोलावावे लागेल.
- जगात दिल्लीची ‘बलात्काराची राजधानी’ अशी नाचक्की झाली आहे. उत्तर प्रदेशातील बलात्काराच्या नृशंस घटना सतत घडत असतात.
- भाजपशासित ‘रामराज्या’त महिला खरोखरच सुरक्षित आहेत काय? गुजरात मॉडेलमध्ये महिला खरेच सुरक्षित आहेत काय?
- आपण मुख्यमंत्री होतात त्या उत्तराखंडमध्ये महिला अत्याचार दीडशे टक्क्यांनी वाढले, तिथे काय उपाययोजना करावी?
- जम्मू-कश्मीरमधील पंडितांच्या माय-भगिनींना नराधमांच्या अत्याचाराचे शिकार व्हावे लागले. त्यांच्यावरील अत्याचार तालिबान्यांना लाजविणारे आहेत, पण जम्मू-कश्मिरात भाजपचे सरकार असताना या प्रश्नी ना विशेष अधिवेशन बोलावले ना कधी चर्चा केली.