‘आसाम रायफल’शी शरणागतीसाठी पत्रव्यवहार

By admin | Published: April 4, 2017 06:00 AM2017-04-04T06:00:36+5:302017-04-04T06:00:36+5:30

सैन्य भरती घोटाळ्यातील आरोपी, सैन्य दलातील कर्मचारी धाकलू पाटील याच्या अटकेसाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत

Correspondence for surrender with 'Assam Rifle' | ‘आसाम रायफल’शी शरणागतीसाठी पत्रव्यवहार

‘आसाम रायफल’शी शरणागतीसाठी पत्रव्यवहार

Next


ठाणे : सैन्य भरती घोटाळ्यातील आरोपी, सैन्य दलातील कर्मचारी धाकलू पाटील याच्या अटकेसाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारलेल्या या आरोपीने शरणागती पत्करावी, यासाठी ठाणे पोलिसांनी आसाम रायफल रेजिमेंटशी पत्रव्यवहार केल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
सैन्य भरतीची प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या टोळीचा ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने फेब्रुवारी महिन्यात पर्दाफाश केला होता. नागपूर येथील सैन्य भरती कार्यालयातील लिपिक वर्गीय कर्मचारी रवींद्रकुमार जांगू, धरमवीरसिंग आणि निगमकुमार पांडे हे या प्रकरणातील प्रमुख आरोपी असून तिघांनाही पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. तपासादरम्यान आसाम रायफल रेजिमेंटमध्ये तैनात असलेला धाकलू पाटील हाही या गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्यातील त्याची भूमिकाही महत्त्वाची असल्याने त्याला ताब्यात घेण्याची कायदेशीर प्रक्रिया पोलिसांनी सुरू करताच धाकलू याने अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली. गतआठवड्यात न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी आरोपीच्या अटकेसाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत.
दरम्यान, ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने २५ फेब्रुवारी रोजी पुणे, नागपूर आणि गोव्यात एकाच वेळी धाडी टाकल्या, त्या वेळी आरोपींसोबत ३५० विद्यार्थ्यांनाही ताब्यात घेण्यात आले होते. पोलिसांनी धाड टाकली, तेव्हा हे विद्यार्थी आरोपींनी फोडलेल्या प्रश्नपत्रिकेचा सराव करीत होते. बहुतांश विद्यार्थी आजी किंवा माजी सैनिकांच्या कुटुंबांतील असून त्यापैकी बहुतेकांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. पेपर फोडण्यासाठी आरोपींशी त्यांनी कोणताही आर्थिक व्यवहार केला नव्हता, हे तपासामध्ये स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना साक्षीदार म्हणून न्यायालयासमोर उभे करण्याचा विचार तपास यंत्रणा करीत आहे. त्यासाठी पुराव्याचा भाग म्हणून २७० विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षराचे नमुने पोलिसांनी घेतले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Correspondence for surrender with 'Assam Rifle'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.