‘ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करा’
By Admin | Published: August 6, 2016 03:01 AM2016-08-06T03:01:20+5:302016-08-06T03:01:20+5:30
परिसरातील रस्त्यांच दुरवस्थेला ठेकेदार आणि प्रशासन जबाबदार आहे.
विरार: या परिसरातील रस्त्यांच दुरवस्थेला ठेकेदार आणि प्रशासन जबाबदार आहे. त्यासाठी गेल्या दोन वर्षांत झालेल्या डांबरीकरणाच्या कामाची चौकशी करून दोषी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर मुंबई महापालिकेच्या धर्तीवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नगरसेवक सुदेश चौधरी यांनी केली आहे.
वसई विरार परिसरातील मुख्य रस्ते आणि अनेक अंतर्गत रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. खड्डे बुजवण्यातही पालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे जनमानसात तीव्र नाराजी व्यक्त केली जात असतानाच चौधरी यांनी थेट प्रशासन आणि ठेकेदारांवरच निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे चौधरी हे आमदार हितेंद्र ठाकूर यांचे अतिशय निकटचे समजले जातात. त्यामुळे सत्ताधारी बहुजन विकास आघाडीकडून पहिल्यांदा ठेकेदार आणि प्रशासनाविरोधात उघडपणे तोफ डागली गेल्याने सत्ताधारी आणि प्रशासनात पहिली ठिणगी पडल्याचे बोलले जाते.
निकृष्ट कामांमुळेच रस्त्यांची चाळण झाली आहे. तसेच मे महिन्यांच्या १५ तारखेनंतर रस्त्यांची व अन्य खोदकामे केली जात नाहीत. मात्र, प्रशासनाचा अतिउत्साह आणि ठेकेदारावरील प्रेमापोटी विरार परिसरात भुयारी गटाराचे काम जूनअखेरर्पंत सुरु होते. त्यामुळेच विरार परिसरातील रस्त्यांची वाताहात झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)