भ्रष्ट नेत्यांना जेलची हवा खावीच लागणार; दानवेंचे पवारांवर शरसंधान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 06:28 PM2019-09-26T18:28:18+5:302019-09-26T18:28:52+5:30
काँग्रेसचे सरकार असताना शरद पवार, अजित पवार यांनी राज्य सहकारी बँकेच्या निधीचा गैरवापर केला.
जळगाव जामोद : काँग्रेसचे सरकार असताना शरद पवार, अजित पवार यांनी राज्य सहकारी बँकेच्या निधीचा गैरवापर केला. नियमबाह्य कर्ज उचलले. साखर कारखाने तोट्यात आणले. ते विक्रीसाठी काढले आणि तेच कारखाने याच बँकेचे पुन्हा कर्ज घेवून विकत घेतले. हा गैरव्यवहार पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना समोर आला. मग अशा नेत्यांवर ईडीची कारवाई झाली तर त्यामध्ये सध्याचा सरकारचा काय दोष. भाजपा सरकार हे सूडबुद्धीने ईडीची कारवाई करीत आहे. असा कांगावा साफ खोटा आहे. जे कराल ते भरावंच लागेल, असे सांगत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शरद पवारांवर शरसंधान साधले.
गुरुवारी जळगाव जामोद येथे भाजपाच्या पेज प्रमुख मेळाव्यात बोलत होते. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना तुरुंगात भेटण्यासाठी सोनिया गांधी व मनमोहन सिंग गेले होते. कारण आमची नावे सांगू नका नाहीतर आमच्यावरही ईडीची कारवाई होईल, अशी भीती या नेत्यांना आहे. शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्याच्या निषेधार्थ बारामती व पुणे बंद ठेवण्यात आले आहे. तेथे जावू नका, काळे झेंडे दाखवण्यात येतील, असे सांगण्यात आले. तरी मी तेथे गेलो. ही कामे आम्ही आधी केलीत, यापुढे काँग्रेस-राष्ट्रवादीला कायम करायची आहेत, अशी खिल्लीही त्यांनी उडवली.
सभेच्या अध्यक्षस्थानी कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. संजय कुटे होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार धृपदराव सावळे, शेगाव नगराध्यक्षा शकुंतला बुच, जळगाव नगराध्यक्ष सीमाताई डोबे यांच्यासह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
युती होणारच!
भाजपा सेनेची युती ही निश्चित होणार असून युतीला २२५ पेक्षा जास्त जागांवर यश मिळेल यात शंका नाही, अशी प्रतिक्रिया ना. रावसाहेब दानवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. युतीत किती जागा भाजपा व किती सेनेच्या असे विचारले असता त्यावर चर्चा सुरू आहे, असे ते म्हणाले. सर्व बाबी लवकरच आपल्यासमोर येतील परंतु एवढे निश्चित आहे की महाराष्ट्रात पुन्हा युतीचीच सत्ता येणार, असेही ते ठामपणे म्हणाले.