अकरावीच्या गोंधळामागे महाविद्यालयांचा खोडसाळपणा
By admin | Published: July 25, 2016 09:06 PM2016-07-25T21:06:25+5:302016-07-25T22:32:35+5:30
अकरावी आॅनलाईन प्रवेशामुळे गेल्या आठवडाभरापासून मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात पालक व विद्यार्थ्यांची धूमश्चक्री सुरू आहे.
चेतन ननावरे/मुंबई : अकरावी आॅनलाईन प्रवेशामुळे गेल्या आठवडाभरापासून मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात पालक व विद्यार्थ्यांची धूमश्चक्री सुरू आहे. यंत्रणेतील दोष गर्दीचे कारण नसून महाविद्यालयांनी केलेल्या खोडसाळपणाचा हा परिणाम असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे उपसंचालक कार्यालयाकडून याप्रकरणी महाविद्यालयांना तंबी देणार असल्याचे
उपसंचालक बी.बी. चव्हाण यांनी लोकमतला सांगितले.
चव्हाण म्हणाले की, उपसंचालक कार्यालयात एकाच प्रकारच्या समस्या घेऊन पालक आणि विद्यार्थी येत आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यंदा १०० टक्के प्रवेश हे आॅनलाईन पद्धतीनेच होणार आहेत. याची पूरेपूर कल्पना मुंबई महानगर क्षेत्रातील मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई आणि रायगडमधील महाविद्यालयांना आहे. मात्र तरीही आॅफलाईन प्रवेश हवा असेल, तर विद्यार्थ्यांनी उपसंचालक कार्यालयातून पत्र घेऊन यावे, असे दिशाभूल करणारे वक्तव्य महाविद्यालयांमधून केले जात आहे. परिणामी आॅफलाईन प्रवेशाच्या शोधात एक पत्र मिळेल, या अपेक्षेने पालक आणि विद्यार्थी उपसंचालक कार्यालयात गर्दी करत आहेत.
केवळ महाविद्यालयातील गर्दी टाळण्यासाठी काही महाविद्यालये अशा प्रकारचा खोडसाळपणा करत असल्याचा अंदाज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. तर काही महाविद्यालयांमधील दलालांचा आॅफलाईन प्रवेशाचा धंदा बंद झाल्याने संबंधित दलाल विद्यार्थी व पालकांमध्ये रोष निर्माण करण्यासाठी अशाप्रकारचा हातखंडा वापरत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे सर्वच महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची दिशाभूल करणारे वक्तव्य करू नये किंवा सल्ला देऊ नये, असे पत्र पाठवणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
पुन्हा गोंधळ, पुन्हा ठिय्या
गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतरही ज्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश निश्चित केला नव्हता, त्यांना सोमवारी आणि मंगळवारी मोबाईलवर मेसेज येणार होते. मात्र सोमवारी सकाळी मेसेज न आल्याने शेकडो विद्यार्थ्यांनी पालकांसह उपसंचालक कार्यालयात धाव घेतली. यावेळी पोलिसांच्या मदतीने कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी पालकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कार्यालयाचा दरवाजाच बंद केला. उपसंचालकांची भेट होत नसल्याने शेकडो पालकांनी विद्यार्थ्यांसह कार्यालयाबाहेरच ठिय्या केला. त्यानंतर उपसंचालक बी.बी.चव्हाण यांनी कार्यालयाबाहेर येऊन पालकांनामार्गदर्शन करत शांत केले. मात्र तोपर्यंत उपसंचालक कार्यालयाला युद्धभूमीचे रूप आले होते.
प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी हे वाचाच...
२५ आणि २६ जुलैला केवळ नॉट रिपोर्टेड विद्यार्थ्यांना मेसेज येतील. मेसेज आलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना मेसेज आलेला नाही, त्यांनी ९ आॅगस्ट रोजी नव्याने अर्ज करायचा आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी याआधी अर्ज भरलेला नाही, किंवा अर्धवट अर्ज भरलेला आहे, त्यांनी ३० जुलै ते २ आॅगस्ट दरम्यान अर्ज पूर्ण भरायचा आहे. त्यांच्यासाठी ४ आॅगस्ट रोजी गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. यादीमधीलमहाविद्यालयात ५ व ६ आॅगस्ट रोजी जाऊन संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश
निश्चित करावा लागेल.
ज्या विद्यार्थ्यांना दूरचे महाविद्यालय मिळालेले आहे, किंवा विषय चुकीचा
निवडलेला आहे, किंवा शाखा बदल करायचा आहे, किंवा प्राधान्यक्रम चुकला
आहे, त्यांनी ९ आॅगस्टला नव्याने अर्ज भरायचा आहे. या विद्यार्थ्यांसाठी
९ ते १३ आॅगस्टदरम्यान पहिली, १८ ते २३ आॅगस्ट दरम्यान दुसरी आणि २५ ते
३० आॅगस्ट दरम्यान तिसरी विशेष फेरी घेतली जाईल. प्रवेश फेरीत
महाविद्यालय मिळाल्यानंतरच विद्यार्थ्यांना आधीच्या महाविद्यालयातील
प्रवेश रद्द करता येईल. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी आधीच्या
महाविद्यालयातील प्रवेश रद्द करू नये.