कॉसमॉस बँकेच्या सायबर हल्ल्यातील ५ कोटी ७२ लाख रुपये हॉगकाँगमधून परत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 08:41 PM2020-02-17T20:41:39+5:302020-02-17T20:46:50+5:30
काँसमॉस बँकेची ९४ कोटी ४२ लाख रुपयांची फसवणुक; याप्रकरणी आजपर्यंत १८ जणांना अटक
पुणे : कॉसमॉस बँकेवर झालेल्या सायबर हल्ल्यातील हाँगकाँग येथील हँगसेन बँकेद्वारे गोठविलेल्या रक्कमेपैकी ५ कोटी ७२ लाख ९५ हजार ८७ रुपये पहिल्या टप्प्यामध्ये कॉसमॉस बँकेस परत केली आहे. तब्बल दीड वर्षाच्या पाठपुराव्यानंतर ही रक्कम मिळविण्यात यश आले आहे.
काँसमॉस बँकेच्या गणेशखिंड रोडवरील मुख्य कार्यालयाच्या ए़ टी़ एम़ स्वीचवर (सर्व्हर) सायबर चोरट्यांनी ११ ऑगस्ट २०१८ रोजी दरोडा घालून बँकेच्या व्हिसा व रुपे डेबिट कार्ड धारकांची माहिती चोरली. त्याद्वारे व्हिसा डेबिट कार्डद्वारे ७८ लाखांचे व्यवहार भारताबाहेर झाले असून रुपे डेबिट कार्डद्वारे २ कोटी ५० लाख रुपयांचे व्यवहार भारतात झाले आहे. एकूण १४ हजार ८४९ व्यवहाराद्वारे ८० कोटी ५० लाख रुपयांची फसवणुक करण्यात आली होती. त्यानंतर १३ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी साडेअकरा वाजता स्वीफ्ट ट्रान्झेंक्शन इनिशिएट करुन हाँगकॉग येथील हँगसेंग बँक या बँकेच्या एएलएम ट्रेडिंगच्या बँक खात्यावर १३ कोटी ९२ लाख रुपये जमा करुन ते काढून घेतले अशाप्रकारे काँसमॉस बँकेची ९४ कोटी ४२ लाख रुपयांची फसवणुक झाली होती. याप्रकरणी आजपर्यंत १८ जणांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास सायबर पोलिसांकडे देण्यात आला होता.
सायबर पोलिसांनी तात्काळ हँगसेंग बँक व हाँगकॉंग पोलिसांशी संपर्क करुन काँसमॉस बँकेतर्फ तक्रार नोंदविली होती. त्याचा तपास डेटेक्टिव्ह हाँगकॉग पोलिसांचे लुंग यांच्याकडे देण्यात आला होता. तसेच हँगसेंग बँकेच्या म्हणण्यानुसार हाँगकाँग पोलीस व हँनसेंग बँकेमध्ये समन्वय साधून दिला होता. त्यानंतर दिल्ली येथे जाऊन १६ नोव्हेंबर २०१८ रोजी भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामार्फत हाँगकाँग पोलीस, हाँगकाँग दुतावास यांच्याकडे सायबर पोलिसांचा पाठपुरावा सुरु होता. या काळात हाँगकाँग पोलीसांचे तपास अधिकारी बदलण्यात आले. नवीन तपासी अधिकारी पँग यान लोक यांच्याशी सायबर पोलिसांनी संपर्क करुन त्यांना गुन्ह्याबाबत पूर्ण माहिती दिली. त्यानंतर पँग यान लोक यांनी कळविले की, पुणे सायबर पोलिसांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे काही रक्कम गोठविण्यात आलेली आहे. सायबर पोलिसांनी काँसमॉस बँकेला तात्काळ हाँगकॉगमध्ये सिव्हील सुट दाखल करण्याच्या सूचना दिल्या. हाँगकॉग न्यायालयामध्ये काँसमॉस बँकेच्या लिगल टीमद्वारे सिव्हील सुट दाखल करण्यात आला व त्याचा पाठपुरावा करण्यात आला. हाँगकॉंग न्यायालयाने हेंनसेंग बँकेद्वारे गाठविण्यात आलेल्या रक्कमेपैकी ८ लाख २ हजार २८३. ६५ अमेरिकन डॉलर म्हणजेच ५ कोटी ७२ लाख ९५ हजार ८७ रुपये एवढी रक्कम पहिल्या टप्प्यामध्ये कॉसमॉस बँकेस परत केली आहे.
पोलीस उपायुक्त संभाजी कदम, तत्कालीन पोलीस उपायुक्त ज्योती प्रियासिंग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, सहायक निरीक्षक सागर पानमंद, पोलीस नाईक अजित कुऱ्हे, संतोष जाधव या पथकाने ही कामगिरी केली.