कॉसमॉस दरोड्यातील आरोपींचा चेन्नईतील सिटी युनियन बँक लूटीत सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 09:00 PM2018-09-18T21:00:57+5:302018-09-18T21:11:05+5:30
कॉसमॉस बँकेवर पडलेल्या सायबर हल्ल्यातील अटक करण्यात आलेल्या चार आरोपींचा चेन्नईतील सिटी युनियन बँकेवरील सायबर हल्ल्यातही सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
पुणे : कॉसमॉस बँकेवर पडलेल्या सायबर हल्ल्यातील अटक करण्यात आलेल्या चार आरोपींचा चेन्नईतील सिटी युनियन बँकेवरील सायबर हल्ल्यातही सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या आरोपींच्या पोलीस कोठडीत २२ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्याचा आदेश मंगळवारी न्यायालयाने दिला.
फहीम मेहफूज शेख (वय २७, रा. नुरानी कॉम्पलेक्स भिवंडी), फहीम अझिम खान (वय ३०, रा. सिमा हॉस्पिटलच्या मागे, आझादनगर, सिल्लोड, औरंगाबाद), शेख मोहम्मद अब्दुल जब्बार (वय २८, रा. आयेशा मस्जिद जवळ, मिर्झा कॉलनी, सिल्लोड, औरंगाबाद), महेश साहेबराव राठोड (वय २२, रा. धावरीतांडा, ता. भोकर, जि. नांदेड) अशी पोलीस कोठडीत वाढ झालेल्या आरोपींची नावे आहेत. नरेश लक्ष्मीनारायण महाराणा (वय ३४, साईकृपा अपार्टमेंट, नारंगी रस्ता, विरार ईस्ट, मूळ रा. कुलीना, ओरीसा), मोहम्मद सईद इक्बाल हुसेन जाफरी उर्फ अली (वय ३०, रा. घर नं. २६, हमालवाडा, दर्गा रस्ता, भिवंडी), युस्टेस अगस्टीन वाझ उर्फ अँथनी (वय ४१, मजाद, जोगेश्वरी ईस्ट मुंबई) हे आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत.
यातील आरोपी फहीम खान, शेख मोहम्मद अब्दुल जब्बार, नरेश महाराणा आणि युस्टेस वाझ या आरोपींचा चेन्नईमधील सिटी युनियन बँकेवर झालेल्या सायबर दरोड्यातही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहेत. याप्रकरणी चेन्नईत ३३.९३ कोटी रुपयांची रक्कम सायबर दरोड्यात लुटल्या गेली होती. आरोपी फहीम याचे कॅनरा बँकेतील खाते सील करण्यात आले आहे. आरोपींकडून ५ लाख ५५ हजार ४०० रुपयांची रोकड, ९ मोबाईल, १८ हार्ड डिस्क, डीव्हीडी, ३ पेन ड्राईव्ह, सिमकार्ड, लॅपटॉप आणि एका आरोपीच्या बँक खात्यातील ४८ हजार रुपये गोठविण्यात आले आहेत. कुणाल शुक्ला आणि अब्दुल भाई यांच्यावर गुन्हा दाखल आहे. सायबर हल्ल्यात कॉसमॉस बँकेतील ४२ कोटी ४२ लाख रुपयांची रक्कम लुटल्या गेली आहे. त्यातील अडीच कोटी रुपयांचे व्यवहार भारतात झाले आहेत.
तपासात २८ देशांमधील २३७ बँकांना कॉसमॉस बँकेतून चोरीला गेलेल्या पैशांची माहिती इंटरपोलला देण्यात आली आहे. त्यांच्याकडून अद्याप माहीती मिळालेली नसल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली. हा गुन्हा आंतरराष्ट्रीय स्वरुपाचा असल्याने त्याचा मूळ सूत्रधार शोधायचा आहे, आरोपींनी गोपनीय माहिती कशी हस्तगत केली याची माहिती मिळविण्यासाठी आणि चेन्नई आणि पुण्यातील सायबर दरोड्या प्रमाणे आरोपींनी इतर गुन्हे केले तर नाही ना, याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयात केली.
............
चेन्नईचा सायबर दरोडा झाला उघड
कॉसमॉसवरील सायबर दरोड्यातील आरोपींना पडकल्यानंतर पुणे पोलिसांनी चेन्नई पोलिसांकडून तेथील दरोड्याचे सीसीटीव्ही फुटेज मागविले. त्यात कॉसमॉसमधील दरोड्यातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे चन्नई येथील दरोडा देखील उघड झाला.नरेश लक्ष्मीनारायण महाराणा (वय ३४, रा. विरार), शेख महम्मद अब्दुल जब्बार (वय २८, रा. संभाजीनगर), फहिम अझीम खान (वय ३०, रा. संभाजीनगर) आणि अँथनी या चौघांनी चेन्नईतील सिटी बँकेतील पैसे क्लोनिंग (बनावट) केलेल्या कार्डनी काढले असल्याची माहिती सायबर शाखेच्या उपायुक्त ज्योतीप्रिया सिंग यांनी दिली.
डिसेंबर २०१७मध्ये चेन्नई येथील सिटी युनियन बँकेचे सर्व्हर हॅक करून ३३ कोटींहून अधिक रुपये एटीएममधून काढण्यात आले होते. या प्रकरणात गेल्या नऊ महिन्यांत चेन्नई पोलिसांच्या हाती काहीच लागले नव्हते. पुणे पोलिसांनी चेन्नई पोलिसांना येथील घटनांचे सीसीटीव्ही फुटेज मागवून तपासले. त्यात नरेश, फहिम, शेख महम्मद आणि अँथनी या चौघांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले.
याबाबत चेन्नई पोलिसांना कळविण्यात आले असून, पुण्यातील तपास पूर्ण झाल्यानंतर या आरोपींना त्यांच्याकडे हस्तांतरित केले जाणार आहे. कॉसमॉस प्रकरणात सायबर पोलिसांनी केलेल्या पत्रव्यवहाराला फ्रान्स, हाँगकाँग यांसह तीन देशांनी प्रतिसाद दिला असून, त्यांनी गुन्ह्याची जास्तीची माहिती मागवून घेतल्याची माहिती देखील ज्योतीप्रिया सिंग यांनी दिली.